जलसंपदा विभाग मुख्यालय नाशिकमध्येच राहणार : जयंत पाटील | पुढारी

जलसंपदा विभाग मुख्यालय नाशिकमध्येच राहणार : जयंत पाटील

नाशिक; पुढारी वृत्तसेवा

गोदावरी खोऱ्यातून जायकवाडीला गतीने पाणी द्यायचे असल्याने नाशिक विभागात जलसंपदा विभागाकडून वेगाने कामे सुरू आहेत. त्यामुळे जलसंपदा विभाग मुख्यालय औरंगाबाद येथे हलविण्याचा प्रश्नच उद‌्भवत नाही. जलसंपदा विभाग मुख्यालय नाशिकमध्येच राहिल, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली.

जलसंपदामंत्री पाटील यांनी आज (दि.२) नाशिक जिल्ह्यातील जलसंपदा विभागामार्फत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीनंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी जलसंपदा विभागाचे मुख्यालय औरंगाबादला हलविण्याची मागणी मराठवाड्यातून होत असल्याबद्दल पाटील यांचे लक्ष वेधण्यात आले.

त्यावर पाटील म्‍हणाले, मध्यंतरीच्या काळात मराठवाड्यातील काही लोकप्रतिनिधी तशी मागणी आपल्याकडे केली होती. पण, गोदावरीच्या ऊर्ध्व खोऱ्यातून मराठवाड्याला गतीने पाणी देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

त्यासाठी नाशिक विभागात मोठ्या प्रमाणावर जलसंपदाची कामे सुरू आहेत. अशा परिस्थितीत नाशिकमधील कार्यालय औरंगाबादला नेल्यास त्याचा परिणाम यंत्रणेवर आणि पर्यायाने कामांवर होईल.

त्यामुळे नाशिकमधील मुख्य कार्यालय इतरत्र हलविण्याचा कोणताही प्रकारचा मानस नसल्याचे पाटील यांनी स्‍पष्‍ट केले.

माझे काम पक्ष बळकटीचे : जयंत पाटील

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याची इच्छा असून, त्यासाठी ताकद ऊभी करणार असल्याची वक्तव्य खासदार अमोल कोल्हे यांनी केले.

याबाबत जयंत पाटील यांना विचारले असता खा. कोल्हे यांची तशी इच्छा असून, त्यावर मी अधिक बोलणे योग्य होणार नाही.

कॉग्रेस व शिवसेनेशी आघाडी करून आम्ही सत्तेत सहभागी आहोत.

माझी जबाबदारी पक्ष बळकट करणे असून राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या ११४ जागांवर अधिकधिक उमेदवार कसे निवडून येतील, यासाठी मी प्रयत्नशील असेल, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

हेही वाचलं का? 

 

Back to top button