सांगलीत बेदाणा, गुळाची आवक वाढली | पुढारी

सांगलीत बेदाणा, गुळाची आवक वाढली

सांगली; पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सव, मोहरम सणाच्या काळात बेदाण्यास मागणी असते. त्यामुळे गेल्या सप्ताहात बेदाण्याची आवक वाढली आहे. दरातही काहीशी वाढ झाली आहे.

गतसप्ताहात 15 हजार 596 क्विंटल आवक झाली. गेल्या सप्ताहापेक्षा ती 15 हजार 596 क्विंटलने जास्त आहे. किमान दर 4 हजार रुपये तर कमाल दर 21 हजार 500 रुपये मिळाला. गेल्या आठवड्यात पावसामुळे मार्केट यार्डात शेतीमाल आवकेत मोठी घट झाली होती. आता उघडिपीने आवक वाढली आहे. गणेशोत्सव, मोहरम पुढील महिन्यात होत आहे. उत्तरभारतात बेदाण्यास मोठी मागणी राहते. त्यामुळे बेदाणा आवक वाढली आहे. दरातही वाढ झाली आहे. गुळाची आवक वाढली आहे. यार्डात रवे गुळाची 7 हजार 609 क्विंटल आवक झाली. गेल्या सप्ताहापेक्षा 4 हजार 494 क्विंटलने आवक जास्त आहे. भेली मध्ये 20 हजार 236 क्विंटल आवक झाली. गेल्या आठवड्यापेक्षा ती 11 हजार 146 क्विंटलने जास्त आहे. गुळाला किमान दर तीन हजार 200 रुपये तर कमाल तीन हजार 945 रुपये क्विंटल मिळाला. बॉक्समधील गुळाची आवक झालेली नाही. तसेच मिरचीची आवक झाली नाही.

आता सोयाबीनचीही आवक थांबली आहे. किमान दर 6120 तर कमाल 6 हजार 660 प्रतिक्विंटल आहे. परपेठ हळद आवक 355 क्विंटल झाली. किमान 6 हजार रुपये तर कमाल सहा हजार 660 रुपये प्रति क्विंटल दर राहिला. राजापुरी हळदीची 869 क्विंटल आवक झाली. मागील सप्ताहापेक्षा ती 679 क्विंटलने जास्त आहे. दर देखील किमान सहा हजार रुपये तर कमाल नऊ हजार 600 रुपये राहिला.

Back to top button