सांगली : महापालिका क्षेत्रात मोकाट कुत्र्यांची दहशत | पुढारी

सांगली : महापालिका क्षेत्रात मोकाट कुत्र्यांची दहशत

सांगली; पुढारी वृत्तसेवा : महानगरपालिका क्षेत्रात मोकाट कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. मंगळवारी सांगलीत एका शाळकरी मुलावर दोन कुत्र्यांनी हल्ला केला, तर शनिवारी कुपवाडमध्ये एका बालिकेवर मोकाट कुत्र्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. महानगरपालिकेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून व्यक्‍त होत आहे.

कुपवाडमध्ये शिवशक्तीनगर येथे एका तीन वर्षांच्या बालिकेला भटक्या कुत्र्यांनी हल्ला गंभीर जखमी केले. मंगळवारी सांगलीत भीमज्योत चौकात एका शाळकरी मुलावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला. मुलाच्या मांडीचा चावा घेतला व फरफटत ओढत नेऊ लागले. नागरिकांनी प्रसंगावधान राखत कुत्र्यांना पिटाळले. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याचे असे प्रकार वाढू लागले आहेत.

महापालिका क्षेत्रात मांस तसेच मांसाहारी पदार्थ विक्री करणार्‍या दुकानांच्या परिसरात मोकाट कुत्री व हिंसक बनलेली कुत्री विशेषत: दिसतात. रस्त्याच्या बाजूला फेकलेले खरकटे अन्न, हाडे यांच्यावर ताव मारण्यासाठी ही कुत्री येतात. रात्री दहा-अकरानंतर रस्त्यावरून जाणार्‍या नागरिकांवर, दुचाकी वाहन चालकांवर ही कुत्री हल्ला करतात. त्यातून अनेकदा अपघातही घडले आहेत. या कुत्र्यांनी अनेकदा लहान मुले, वयोवृद्ध व्यक्तींवर हल्ले केले आहेत. कुत्र्यांची नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. ‘डॉग पॉण्ड’च्या सुविधेची मागणी अनेकदा झालेली आहे. मात्र ती केवळ चर्चेतच राहत आहे.

दोन डॉग व्हॅन; 12 कर्मचारी

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी कुत्र्यांची नसबंदी केली जाते. कुत्री पकडण्यासाठी सांगली विभागासाठी 1 डॉगव्हॅन व 4 कर्मचारी (कॅचर) आणि मिरज व कुपवाडसाठी 1 डॉगव्हॅन आणि 8 कर्मचारी आहेत. कुत्री पकडण्यासाठी डॉगव्हॅन शहरात फिरते. मात्र ही डॉगव्हॅन दिसली की कुत्री धूम ठोकतात, असा प्रकार वारंवार घडतो.

कुत्री पकडण्याच्या पद्धतीत हवा बदल

मोकाट कुत्री फासा पद्धतीने पकडली जातात. ही पद्धत पुरेशी प्रभावी नाही. जाळी टाकून कुत्री पकडणे गरजेचे आहे, असे मतही काही नगरसेवकांनी व्यक्त केले.

पिसाळलेल्या आठ कुत्र्यांना दयामरण

दुर्धर आजाराने ग्रस्त, पिसाळलेल्या कुत्र्यांना दयामरण दिले जाते. गेल्या दीड महिन्यात महापालिका क्षेत्रातील पिसाळलेल्या 8 कुत्र्यांना, तर दुर्धर आजारी दोन कुत्र्यांना दयामरण दिल्याचे सांगण्यात आले.

दत्तक योजना, एनजीओंचा पुढाकार

मोकाट भटकणार्‍या कुत्र्यांची पिले दत्तक घेऊन पाळण्याबाबत मध्यंतरी सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाहन केले होते. त्याला थोडा प्रतिसादही मिळाला. पण त्याला व्यापक प्रतिसाद मिळणे गरजेचे आहेे. एनजीओंचा पुढाकारही आवश्यक आहे.

दिवसभरात 2 ते 4 कुत्र्यांचीच होते नसबंदी

मोकाट कुत्र्यांवर नसबंदीसाठी प्रतापसिंह उद्यानात महापालिकेचे केंद्र कार्यरत आहे. याठिकाणी दररोज सरासरी 2 ते 4 कुत्र्यांची नसबंदी होते. काही दिवशी 7 ते 8 कुत्र्यांची नसबंदीही होते. याठिकाणी दिवसाला किमान 10 शस्त्रक्रिया होऊ शकतात. नसबंदी केलेल्या कुत्र्यांना एक ते दोन दिवस देखरेखेखाली ठेवले जाते.

Back to top button