Sadabhau Khot : स्वाभिमानी शेतकरी संघटना भीक मागून सदाभाऊंची उधारी भागवणार | पुढारी

Sadabhau Khot : स्वाभिमानी शेतकरी संघटना भीक मागून सदाभाऊंची उधारी भागवणार

इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा : माजी मंत्री सदाभाऊ खोत  (Sadabhau Khot) यांनी सांगोला तालुक्यातील हॉटेलचे बिल बुडवल्याच्या कारणावरून संबंधित हॉटेल मालकाने त्यांना रस्त्यात अडवल्याच्या बातम्या प्रसारीत झाल्या. त्यामुळे राज्यभर वाळवा तालुक्याची बदनामी, अपमान झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने भीक मागून संबंधित हॉटेल मालकाचे पैसे भागवू, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे व भागवत जाधव यांनी पत्रकारांना दिली.

खराडे व जाधव म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी सांगोला तालुक्यातील एका हॉटेल व्यावसायिकाने माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांना रस्त्यावर अडवून उधारी मागितली. त्यावर महाराष्ट्रात खूप चर्चा सुरू आहे. सदाभाऊ खोत हे वाळवा तालुक्यातील आहेत. उधारीवरून आमच्या वाळवा तालुक्याची बदनामी करू नका. त्यांची हॉटेलची ६६ हजार ४५० रुपयांची उधारी आम्ही भीक मागून भरणार आहोत.

ते म्हणाले की, सदाभाऊ यांना उधारीसाठी इथून पुढे कोणीही अडवून आमच्या वाळवा तालुक्याचा अपमान करू नये. सदाभाऊ पूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे होते. ज्यांच्याकडे सदाभाऊंची उधारी असेल, त्यांनी आमच्याशी संपर्क करावा. आम्ही ती उधारी भीक मागून भरू, असे खराडे, जाधव यांनी म्हटले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button