कोल्हापूर : गरिबांना वस्‍तू वाटणार आहेत, अशी बतावणी करत भामट्याने दागिना लांबवला | पुढारी

कोल्हापूर : गरिबांना वस्‍तू वाटणार आहेत, अशी बतावणी करत भामट्याने दागिना लांबवला

कोल्‍हापूर : पुढारी वृत्तसेवा : एका श्रीमंत माणसाला खूप वर्षांनी मुलगा झाला आहे. तो गरिबांना मोफत वस्‍तू वाटणार आहे. तुमचे दागिने काढून ठेवा म्‍हणजे तुम्‍हाला पण वस्‍तू मिळतील, अशी बतावणी करत भामट्याने महिलेचे अर्धा तोळ्याचे दागिने हातोहात लंपास केले. ताराबाई पार्कातील विश्‍वेश्‍वरय्‍या हॉलनजीक भरदुपारी हा प्रकार घडला. याप्रकरणी दोघा अनोळखींविरोधात शाहूपुरी पोलिसांत गुन्‍हा दाखल झाला.

फिर्यादी वहिदा इमाम हुसेन (वय ५०, रा. सदर बाजार) या ताराबाई पार्कातून पायी चालल्‍या होत्‍या. यावेळी दोन संशयित त्‍यांच्‍याजवळ आले. त्‍यातील एका भामट्याने एक श्रीमंत माणसाला खूप वर्षांनी मुल झाले आहे. तो गरिबांना मोफत वस्‍तू देणार असल्याचे वहिदा हुसेन यांना सांगितले. त्‍यांना वस्‍तू हव्‍या असतील, तर गरीब दिसण्‍यासाठी अंगावरील दागिने काढून पिशवीत ठेवण्‍यास भाग पाडले. वहिदा हुसेन यांनी दागिने पिशवीत ठेवले. काही वेळाने दोघे संशयित निघून गेले. यावेळी हुसेन यांनी त्यांची पिशवी तपासली असता दागिने मिळून आले नाही. आपली फसवणूक झाल्‍याने लक्षात येताच त्‍यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्‍यात धाव घेत तक्रार दिली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button