Chandrakant Patil : ‘अग्निपथ’च्या विरोधात राजकीय हेतुने हिंसाचार | पुढारी

Chandrakant Patil : 'अग्निपथ’च्या विरोधात राजकीय हेतुने हिंसाचार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : लष्करात जाऊन देशाची सेवा करू इच्छिणारा तरूण कधीही देशाच्या संपत्तीचे नुकसान करू शकत नाही. अग्निपथ योजनेच्या विरोधात चाललेला हिंसाचार हा राजकीय हेतूने सुरू आहे. त्यातून गुन्हे दाखल झाल्यामुळे संबंधित तरुणांना कोणतीही नोकरी मिळणे अशक्य होईल. त्यांचे करिअरचे कायमस्वरुपी नुकसान होईल, अशी भीती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज (दि.१८) येथे व्यक्त केली.

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)  म्हणाले की, अग्निपथ योजनेतून केंद्र सरकारने तरुणांना ४ वर्षांसाठी सैन्यात काम करण्याची संधी दिली आहे. या योजनेमुळे तरुणांना लष्करी प्रशिक्षण मिळेल, चांगले वेतन आणि नोकरी सोडताना साडेअकरा लाख रुपये मिळतील. तसेच सैन्यातून परतल्यानंतर समाजात व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. या योजनेमुळे समाजात लष्करी प्रशिक्षण मिळालेल्या शिस्तबद्ध तरुणांचे प्रमाण वाढेल. या योजनेमुळे तरुणांचे कोणतेही नुकसान होणार नाही. अग्निपथ योजनेसोबत नियमित लष्करी भरतीसुद्धा चालूच राहणार आहे.

राजकीय हेतुने अग्निपथच्या विरोधात हिंसाचाराला चिथावणी देण्यात येत आहे. या हिंसाचारात भाग घेणाऱ्या तरुणांच्या विरोधात गुन्हे दाखल होतील. नंतर त्यांना लष्करात, सरकारमध्ये किंवा खासगी क्षेत्रातही नोकरी मिळणार नाही. त्यांचे आयुष्यभराचे नुकसान होईल. हिंसाचार केल्यामुळे आपले करिअरचे काय नुकसान होईल, याचा तरुणांनी विचार करावा. एकूणच तरुणांनी या योजनेबाबत पूर्ण माहिती घेऊन शांतपणे विचार करावा, असे त्यांनी म्हटले आहे.

अग्निपथ योजनेबाबत पूर्ण माहिती घेतली. तर गैरसमज दूर होईल, असा विश्वास व्यक्त करून ते म्हणाले की, ज्या तरुणांना लष्करात भरती होऊन देशाची सेवा करायची आहे, ते कधीही राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करून समाजात संकट निर्माण करणार नाहीत. सध्या या योजनेच्याविरोधात काही ठिकाणी होत असलेला हिंसाचार हा राजकीय हेतूने घडविण्यात येत आहे. समाजात अराजक निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button