

इस्लामपूर: पुढारी वृत्तसेवा: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात निघालेले अजामीनपात्र अटक वॉरंट येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी रद्द केले. त्यामुळे राज ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे. शिराळा न्यायालयाने हे अटक वॉरंट काढले होते. याविरोधात मनसेच्यावतीने येथील जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याबाबत सोमवारी सुनावणी झाली होती, यावर न्यायालयाने शुक्रवारी (दि. १७) निर्णय दिला.
मराठी तरुणांना रेल्वेत नोकरी मिळावी म्हणून मनसेने राज्यभर आंदोलन केले होते. यावेळी कोकरूड पोलिस ठाण्यात राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी शिराळा न्यायालयात सुरू होती. सुनावणीस सातत्याने गैरहजर राहिल्याने न्यायालयाने राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढले होते. राज ठाकरे यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्या गैरहजेरीत अटक वॉरंट रद्द करावे व त्यांना जामीन मंजूर करावा, असा अर्ज त्यांच्या वकिलांनी दिला होता. हा अर्जही न्यायालयाने फेटाळून लावला होता.
यानंतर इस्लामपूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात राज ठाकरे यांच्या गैरहजेरीत अटक वॉरंट रद्द करून त्यांना जामीन मंजूर करावा, असा अर्ज दाखल करण्यात आला होता. सोमवारी न्यायाधीश जयश्री परदेशी यांच्यासमोर या अर्जावर सुनावणी झाली होती. सरकारी पक्षातर्फे अॅड. रणजित पाटील यांनी तर राज ठाकरे यांच्या बाजूने अॅड. विजय खरात, अॅड. सतिश कदम, अॅड. आनंद चव्हाण यांनी युक्तीवाद केला होता.
दोन्ही बाजूकडील युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने यावर शुक्रवारी (दि.१७) रोजी निर्णय देत हे अटक वॉरंट रद्द करण्यात येत असल्याचे सांगितले. आता राज ठाकरे यांचे या गुन्ह्यातून नाव वगळण्यात यावे यासाठी पुन्हा शिराळा न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे मनसेचे तालुकाध्यक्ष सनी खराडे यांनी सांगितले.
राज ठाकरे यांच्यावतीने न्यायालयात दाखल करण्यात आलेला अर्ज मंजुर करत न्यायालयाने ठाकरे यांचे अटक वॉरंट रद्द केले असल्याचे ठाकरे यांचे वकील अॅड. विजय खरात यांनी सांगितले. यापुढे सुनावणीसाठी न्यायालयाला जेव्हा गरज असेल तेंव्हा राज ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणीस हजर रहावे, असा आदेशही न्यायालयाने दिला आहे.
हेही वाचलंत का?