Presidential Election 2022 : विरोधकांची सूत्रे शरद पवारांकडे; सोमवारी महत्त्वाची बैठक | पुढारी

Presidential Election 2022 : विरोधकांची सूत्रे शरद पवारांकडे; सोमवारी महत्त्वाची बैठक

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रपती निवडणुकीच्या (Presidential Election 2022) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रपती पदासाठी संयुक्त चेहरा देण्याचे विरोधकांनी ठरवले असले, तरी अद्याप कुठल्याही नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही. अशात विरोधकांची सर्व सुत्रे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे आल्याची दिसून येत आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी पवारांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.२१) दुपारी अडीच वाजता संसद भवनात विरोधकांची बैठक होणार आहे. या बैठकीत विरोधकांचा उमेदवार निश्चित होण्याची शक्यता आहे. या बैठकीसाठी १७ पक्षाचे नेते उपस्थित राहतील.

(Presidential Election 2022)  दरम्यान, भाजपने देखील विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चा केली आहे. राजकीय पक्षांसोबत चर्चा करण्याची जबाबदारी राजनाथ सिंह तसेच राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यावर सोपवण्यात आली आहे. राजनाथ सिंह यांनी निवडणुकीसंबंधी पवारांसोबत चर्चा केली आहे. शिवाय इतर नेत्यांसोबत ही ते संपर्कात आहेत. देशातील सर्वोच्च घटनात्मक पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २९ जून आहे. अशात पुढील आठवड्यात कुठल्याही परिस्थितीत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांना त्यांचा उमेदवार निश्चित करावा लागले.

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एकूण मतांचे मूल्य १०, ८६, ४३१ आहे. आणि निवडणूक जिंकण्यासाठी ५, ४३, २१६ मतांची आवश्यकता आहे. एनडीएकडे एकूण ५.२६ लाख मते आहेत, तर संपूर्ण विरोधक आणि अपक्षांची मिळून ५.६० लाख मते आहेत. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपत आहे. आणि नवीन राष्ट्रपतींना २५ जुलैपर्यंत शपथ घ्यायची आहे. अशा स्थितीत २४ जुलैपर्यंत नव्या राष्ट्रपतींची निवड होणे गरजेचे आहे. निवडणूक आयोगाने तारखा जाहीर करताना याची काळजी घेतली आहे, हे विशेष.

हेही वाचलंत का ? 

Back to top button