जालना : कृषी सेवा केंद्राची भिंत फोडून ५ लाखांचा मुद्देमाल लंपास | पुढारी

जालना : कृषी सेवा केंद्राची भिंत फोडून ५ लाखांचा मुद्देमाल लंपास

वडीगोद्री (जालना); पुढारी वृत्तसेवा: अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथील बळीराजा कृषी सेवा केंद्र अज्ञात चोरट्याकडून फोडण्यात आले. दुकानाची मागच्या बाजूची भिंत फोडून अज्ञात चोरट्याने ५०० कपाशीच्या बॅगा व रोख ३० हजार असा सुमारे ५ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना शहागड -पैठण रोडवरील साष्टपिंपळगाव येथे गुरूवारच्या मध्यरात्री घडली. तर शुक्रवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास दुकानदार गणेश शिंदे यांनी दुकान उघडल्यानंतर चोरीची घटना समोर आली.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथील शहागड – पैठण रोडवरील गणेश शिवाजी शिंदे हे शुक्रवारी (दि.१७ जून) रोजी सकाळी ८ वाजता बळीराजा कृषी सेवा केंद्र दुकान उघडण्यासाठी गेले होते. याच दरम्यान त्यांना दुकानाच्या मागील बाजुची भिंत फोडून अज्ञात चोरट्याने कपाशीचे ५०० बॅग, इतर बियाणे व गल्ल्यातील ३० हजार रुपये चोरून नेल्याचे निदर्शनास आले. कपाशी बॅगा चोरी गेल्याने दुकानदाराला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

या चोरीच्या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ, पोलिस उपनिरीक्षक गजानन कौळासे, डीबी पथक, डॉग स्कॉड, ठसे तज्ञांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली आहे. चोरीच्या घटनेचा तपास सुरू असून याप्रकरणी अद्याप कुठलीही तक्रार दाखल नसल्याचे पोलिस उपनिरीक्षक गजानन कौळासे यांनी सांगितले.

हेही वाचलंत का? 

Back to top button