सांगली : मिरजेत 50 किलो गांजा जप्त; दोघांना अटक | पुढारी

सांगली : मिरजेत 50 किलो गांजा जप्त; दोघांना अटक

सांगली, पुढारी वृत्तसेवा :  मिरज-माधवनगर बायपास रस्त्यावर दुचाकीवरून 50 किलो गांजा घेऊन जाणार्‍या फारूख इस्माईल नदाफ (वय 48, रा. ढवळेश्वर कॉलनी, कुपवाड) आणि फारूख बशीर नदाफ (वय 31, रा. हातकणंगले, जि. कोल्हापूर) या दोघांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि महात्मा गांधी चौक पोलिसांनी आवळल्या. दोघांकडून 50 किलो गांजा आणि मोटारसायकल असा 6 लाख 53 हजार 110 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, स्थानिक गुन्हे अन्वेषण प्रशांत माळी आणि आर्यन देशिंगकर हे दोघे गस्त घालत होते. त्यावेळी संशयित फारूख नदाफ हा (एम.एच.10 बी.एच.9028) या मोटरसायकलीवरून माधवनगर बायपास रस्त्याने मिरजमध्ये गांजा विक्रीसाठी जात असल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर पोलिस उपअधीक्षक अशोक वीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत निशानदार आणि महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रवीराज फडणीस यांच्यासह सुधीर गोरे, मेघराज रुपनर, अरुण औताडे, संदीप नलावडे, कुबेर खोत, हेमंत ओमासे, इम्राण मुल्ला, चेतन महाजन, प्रशांत माळी, आर्यन देशिंगकर, सुहेल कार्तियानी यांच्या पथकाने सापळा लावला.

यावेळी रस्त्यावरुन दोघेजण माटारसायकलवरून दोन मोठ्या पिशव्या व बॅग घेऊन आलेले दिसले. पोलिसांनी त्यांना आडवले. त्यावेळी दोघांनी पिशव्यात साड्या असल्याचे सांगितले. परंतु त्यांची झडत घेतली असता त्यांच्याकडे सहा लाख रुपये किंमतीचा 25 पॅकेटमध्ये भरलेला 50 किलो गांजा मिळून आला. प्राथमिक तपासात दोघे हा गांजा मिरजेकडे घेऊन जात असल्याचे आढळून आले आहे.दोघांकडून गांजा आणि मोटारसायकल असा 6 लाख 53 हजार 110 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मिरजेचे गांजा कनेक्शन पुन्हा चर्चेत!

मोटारसायकलवरून राजरोसपणे 50 किलो गांजा मिरजेत घेऊन जाणार्‍या दोघांना पकडण्यात आले. इतक्या मोठ्या प्रमाणातील गांजा दोघेजण मिरजेत नेमके कोणाकडे घेऊन निघाले होते, याबाबत त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात येत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा पकडल्याने मिरज आणि गांजा कनेक्शन पुन्हा समोर आले आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button