ब्रह्मपुरी ठरले जगातील सर्वात हॉट शहर ; चंद्रपूर दुसऱ्या स्थानी | पुढारी

ब्रह्मपुरी ठरले जगातील सर्वात हॉट शहर ; चंद्रपूर दुसऱ्या स्थानी

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण विश्वामध्ये बुधवार ते आज, गुरूवार दरम्यान २४ तासात विदर्भाच्या तापमानाची सर्वाधिक नोंद घेण्यात आली आहे. जगात चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहराची सर्वात उष्ण शहर म्हणून तापमानात नोंद करण्यात आली. तर त्यापाठोपाठ चंद्रपूर दुसऱ्या स्थानावर आहे. अचानक वाढलेल्या तापमानामुळे उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. उकाड्यामुळे अंगाची लाहिलाही होत आहे.

विदर्भातील तापमानाची चर्चा आता संपूर्ण जगात होऊ लागली आहे. काल बुधवारी(दि.२०) तापमानाची जी नोंद घेण्यात आली. त्यामध्ये जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीतील पहिली तीन शहरे विदर्भातील आहेत. ब्रह्मपुरी येथे जगातील सर्वाधिक 45.3 अंश तापमानाची नोंद करण्यात आली. त्या पाठोपाठ जगातील दुसरे उष्ण शहर चद्रपूर ठरले. चंद्रपूरचे तापमान 45.2 अंश इतके नोंदले गेले, तर अकोला येथे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे उष्ण शहर ठरले असून त्याचे तापमान 44.9 अंश इतके नोंदवले गेले. याखेरीज जगातील पहिल्या 15 उष्ण शहरांमध्ये भारतातील 13 तर विदर्भातील पाच शहरांचा समावेश झाला आहे.

या पाच शहरांमध्ये वर्धा आणि अमरावती येथे 44.2 इतक्या अंश तापमान नोंद घेण्यात आली. ही दोन्ही शहरे जगातील दहाव्या क्रमांकाची उष्ण शहरे ठरली. विदर्भातील सर्वच शहरांमधील तापमान 42 अंशांहून अधिक नोंदवले गेले आहे. उकाड्यामुळे घरोघरी कुलर व एसीचा वापर वाढला आहे. यामुळे वीज पुरवठा यंत्रणेवरील ताणही वाढू लागला आहे. ब्रह्मपुरी आणि चंद्रपुरात दुपारी १२ नंतर शहरातील रस्ते ओस पडू लागली आहेत.

Back to top button