प्रशांत किशोर उद्याच काँग्रेसवासी होणार ? तब्बल ६०० स्लाइड्सचे प्रेझेंटेशन तयार | पुढारी

प्रशांत किशोर उद्याच काँग्रेसवासी होणार ? तब्बल ६०० स्लाइड्सचे प्रेझेंटेशन तयार

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची अटकळ जोर धरू लागली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत किशोर उद्या (ता.२२) काँग्रेसमध्ये जाण्यासाठी पक्षाशी चर्चा करणार आहेत. या बैठकीला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीही उपस्थित राहणार आहेत. प्रशांत किशोर काँग्रेससमोर प्रेझेंटेशनही देणार असून त्यासाठी त्यांनी ६०० स्लाइड्सचे प्रेझेंटेशन तयार केल्याचे सूत्रांनी सांगितले.

यापूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाच्या नेत्यांना सांगितले आहे की प्रशांत किशोर लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, तसेच ते २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती तयार करतील. गेल्या काही दिवसांपासून प्रशांत किशोर हे सोनिया गांधींसह पक्षातील बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.

पक्षाच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत प्रशांत किशोर यांनी मध्य प्रदेश निवडणुकीबाबत कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांच्याशीही चर्चा केली. बुधवारी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही दिल्ली गाठली आणि प्रशांत किशोर यांच्यासोबत पक्षाच्या बैठकीत भाग घेतला.

काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रशांत किशोर विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पक्षाची रणनीती तयार करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय ते काँग्रेसच्या आघाडीतील भागीदारांशीही चर्चा करतील आणि त्याचा अहवाल सोनिया गांधींना सादर करतील.

दुसरीकडे, पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी स्थापन केलेली विशेष समिती काँग्रेस संघटना मजबूत करण्यासाठी आणि आगामी निवडणुकांसाठी रणनीती तयार करण्यासाठी मार्ग सुचवण्यासाठी २-३ दिवसांत आपला अहवाल देऊ शकते. त्यात प्रशांत किशोर यांच्या काँग्रेसमधील भूमिकेबाबतही सूचना असतील.

काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी सांगितले की, विशेष समितीने प्रशांत किशोर यांच्या सूचनांचा विचार केला आहे आणि त्यावर विचार सुरू आहे. ते म्हणाले, काँग्रेस संघटनेने सर्व बदलांशी जुळवून घेतले पाहिजे आणि म्हणूनच ही समिती प्रशांत किशोर आणि विविध अनुभवी नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षांना वेळोवेळी दिलेल्या विविध सूचनांवर गेल्या तीन दिवसांपासून विचारमंथन करत आहेत.

हे ही वाचलं का ?

Back to top button