एन.डी-सराेज यांच्या लग्नात नवरदेवाला शोधताना शरद पवारांची झाली हाेती दमछाक | पुढारी

एन.डी-सराेज यांच्या लग्नात नवरदेवाला शोधताना शरद पवारांची झाली हाेती दमछाक

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘प्रा. डाॅ. एन. डी. पाटील; चळवळींचा महामेरू, बहुत जनांसी आधारू’ या विजया पाटील लिखित पुस्तकात एन.डी. पाटील आणि शरद पवारांच्या मोठ्या भगिणी सरोज नारायण पाटील यांच्या लग्नामध्ये (N. D. Patil’s wedding) एन.डी. पाटील यांच्या धारदार व्यक्तीमत्वाचा, ध्येयवादी आणि तत्वनिष्ठ विचारांचा पगडा किती होता, याचं दर्शन होते. त्यामध्ये त्यांच्या पत्नी सरोज पाटील असं सांगतात…

…तुम्हाला तुमची पोरगी  जड झाली आहे का?

“जातीभेद, धर्मभेद यांचे वारेही आमच्या घरात शिवले नव्हते. माझ्या आई-वडिलांच्या लोकसंग्रह वृत्तीतून माझे लग्न एन. डी. पाटील यांच्याबरोबर झाले आणि माझ्यामध्ये थोडी फार सामाजिक दृष्टीही येऊ शकली. वडील म्हणायचे, “आपल्या मुलीने इथे जिथे फुले वेचली, तिथे तिला काटे का वेचायला लावायचे?” यावर आई म्हणत, “चिमण्या कावळ्याप्रमाणे अनेक जण संसार करतात. हा मुलगा असामान्य आहे. त्याच्या डोळ्यांत बुद्धीची चमक आहे. वागण्यात प्रामाणिकपणा आहे. यालाच मुलगी द्यायची.”

एन. डी. पाटील यांना ओळखणारे अनेक लोक आई-वडिलांना म्हणत, “अहो! याच्या पायाला भोवरा आहे. एखाद्या दरवेशाप्रमाणे हा भटकत असतो. कशाला मुलगी देता? तुम्हाला ती जड झाली आहे का?”, असे वादविवाद चालू होते. या वादविवादात माझ्या पसंती-नापसंतीचा विचार कोणाच्याच डोक्यात नव्हता. आमच्या आईचे व्यक्तिमत्त्व प्रभावी असल्याने अशा वादाच्या वेळी आईचा नेहमीच विजय होत असे. अशारितीने साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबरात माझे लग्न एकदाचे ठरले. (N. D. Patil’s wedding)

लग्नापूर्वीच एन. डी. पाटील यांनी दिलं स्पष्ट उत्तर

लग्नापूर्वीच एन. डी. पाटलांनी सांगितलं, “माझ्याकडे शेती नाही. असली तरी आम्हाला मिळणार नाही. मी घरात वेळ आणि पैसा दोन्ही देऊ शकणार नाही. कारण मी पूर्ण वेळ पक्षाचं काम करायचा निर्णय घेतला आहे. अर्थात, माझी तुमच्याकडूनही कुठलीच अपेक्षा नाही. मला मुलगी आणि नारळ चालेल. तुम्ही करून द्याल तसे लग्न मला मान्य आहे. हे सारे जर मुलीला चालत असेल, तर माझी काही हरकत नाही.”

या त्यांच्या अटींबद्दल विचार करण्याचं माझं वय नव्हतं आणि त्याबाबत मला कुणी मार्गदर्शनही केलं नाही. माझ्या आई-आबांनी त्यांच्या सर्व अटी मान्य केल्या आणि आमचं लग्न ठरलं. माझे दूसरे भाऊ अनंतराव त्यानंतर एकदा एन. डी. पाटलांना फिरायला घेऊन गेले. “आता लग्न होणार; मग तुम्ही पुढचा विचार काय केलाय?”, असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर एन. डी पाटील म्हणाले, “कोणतीही वेळ आली तरी तुमच्या दारात येणार नाही,”

बस्स, लग्नापूर्वी झाली ती एवढीच चर्चा. त्यामध्ये मी कुठेच नव्हते. आजच्या मुली स्वतंत्रपणे स्वतःच्या आयुष्याचा विचार करतात. तसे करण्याचे ते दिवसच नव्हते.”आपले आई-आबा आपले चांगलेच करणार,” असा विश्वास असायचा. मी तर लग्न, त्यानंतरचं आयुष्य याचा विचारच केला नव्हता. तेवढी परिपक्वता माझ्यात नव्हती.

भेटायला येत नाही, फोन करत नाही. हा कसला नवरा?

त्यावेळी मी पुणे येथील आबासाहेब गरवारे कॉलेजात बी. ए. च्या दुसऱ्या वर्षात शिकत होते. होस्टेलमध्ये राहत होते. माझ्याबरोबर इतरही अनेक मैत्रिणींची लग्ने ठरली होती. शनिवार आला की, सर्व मैत्रिणींचे भावी यजमान होस्टेलवर येत आणि आपल्या भावी पत्नींना घेऊन चित्रपटाला किंवा फिरायला जात. याला अपवाद फक्त एन. डी. पाटील होते. ते शेवटपर्यंत या होस्टेलची पायरी चढले नाहीत. मी मनात म्हणायची, “हे कधीच कसे येत नाहीत? फोनही करीत नाही. हा कसला नवरा?’ अशारितीने मनाला हळूहळू चटके बसण्यास सुरुवात झाली होती.

नवरदेवाला शोधताना १८ वर्षांचे शरद पवार थकून गेले

शेवटी १७ मे १९६० चा दिवस उजाडला. लग्नाची वेळ सकाळी १०.०० ची होती. मांडवात लोक जमू लागले होते. अक्षता देण्याची वेळ येऊन ठेपली; पण नवरदेवाचा पत्ता काय? माझ्या मनात पाल चुकचुकली, “या गृहस्थाने रामदासासारखे पलायन तर केले नाही ना?” चार दिशेला चार भाऊ नवरदेवांना म्हणजेच एन.डी. पाटील यांना शोधायला गेले. त्या काळी बिचाऱ्यांकडे वाहनेही नव्हती.

शरद (राष्ट्रवादीचे प्रमुख) एक डबडी मोटारसायकल घेऊन पळाला. उन्हात वणवण फिरून परत मांडवात परतला, तो अगदी दमलेल्या अवस्थेत! अक्षरशः त्याच्या तोंडाला फेस आला होता. १८ वर्षांचे ते पोर थकून गेले होते. विरोधी पक्षाची चपराक कशी असते, त्याचा अनुभव लहान वयातच आला. त्यामुळेच की काय, पुढील आयुष्यात विरोधी पक्षाशी त्याला चांगलेच जमवून घेता येऊ लागले. शेवटी नवरदेवाचा शोध लागला. नवरदेव आणि वरात एका ओढ्यातील चिखलात अडकून पडले होते. शेवटी घाईघाईने नवरदेवाची गाडी ओढून काढली आणि त्यांना मांडवात बिन-आंघोळीचेच उभे केले. आणि एकदाचे अक्षता टाकून त्यांना चतुर्भुज केले.

हे वाचलंत का? 

Back to top button