

अलिबाग : रायगड जिल्ह्यात दरोडा, घरफोड्या, चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असून, चोरांवर नियंत्रण मिळविण्यात रायगड पोलीस अपयशी ठरत आहेत. जिल्ह्यात 2024 पेक्षा 2025 मध्ये दरोड्यांचे प्रमाण वाढले आहे.
2025 या मागील वर्षभरात जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरीचे 445 गुन्हे दाखल झाले असून, केवळ 295 गुन्ह्यांतील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. तर 150 गुन्ह्यांतील आरोपी अद्याप मोकाट आहेत. विशेष म्हणजे दिवसभर टेहळणी करून रात्रीच्या अंधारात चोऱ्या केल्या जात आहेत. पोलिसांनी वाढवलेली गस्तही चोऱ्या रोखण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
दरोडा, घरफोडी, चोरीच्या घटनांवरून पोलिसांनी चोरट्यांच्या कार्यपद्धतीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. चोरी झालेल्या परिसरात दिवसभरात काही अनोळखी लोक येऊन गेल्याची माहिती पोलिसांना स्थानिकांकडून मिळत आहे. दिवसभर शहरांसह, गावांमध्ये फिरून चोरटे बंद घरांची टेहळणी करीत आहेत. यानंतर रात्रीच्या वेळेत घरफोडी करून लाखो रुपयांचा किमती मुद्देमाल लंपास करीत आहेत. मात्र गुन्हे उकल करण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्याचे चित्र दिसून येते.
दरोडा, घरफोडी, चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविली आहे. हद्दीत सर्वत्र पोलिस पोहोचले पाहिजेत, अशा सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांनी पोलिस ठाण्यात पूर्वकल्पना द्यावी, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. मात्र एवढे करूनही घरफोड्यांचे सत्र सुरू आहे.
जिल्ह्यात घरफोड्यांच्या घटनांमध्ये जिल्ह्याबाहेरील तसेच परराज्यातील टोळ्या सक्रिय असल्याचे मागील काही वर्षात रायगड पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून स्पष्ट होते. सकाळी चोरटे जिल्ह्यात दाखल होतात. टेहळणी करतात व रात्री चोरी करून जिल्ह्याबाहेर पसार होत आहेत. यामुळे घरफोड्यांच्या गुन्ह्यांची उकल करणे कठीण होऊन बसले आहे.
3 जानेवारी रोजी अलिबाग तालुक्यातील मापगाव-मुशेत तेथील कुकूचकू कंपनीचे मालकाच्या घरावर 8 ते 9 जणांनी सशस्त्र दरोडा टाकीत रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने, मोबाईल असा सुमारे 18 लाख 22 हजार रुपये किंमतीचा ऐवज लुटला होता. या दरोड्याप्रकरणी अलिबाग पोलीस व रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने संयुक्त कारवाई करीत सात आरोपींना भिवंडी येथून ताब्यात घेतले. दरोडेखोरांनी पाथरे यांच्या घरातील काही मंडळींना डांबून ठेवण्याबरोबरच पेट्रोल अंगावर टाकून जीवे ठार मारण्याची धमकी देण्याचा प्रकार यात घडला होता. सुदैवाने यात कोणास मोठी इजा झाली नाही. त्याचबरोबर पोलिसांनी तातडीने तपास करीत आरोपींना अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरु आहे. मात्र दरोडेखोरांना जरब बसण्यासाठी उपाययोजनांची गरज आहे.