

मुंबई : विदेशी संस्थांनी केलेला विक्रीचा मारा, अमेरिकन शुल्काची टांगती तलवार यामुळे मंगळवारी सलग दुसऱ्या सत्रात शेअर निर्देशांकांत घट झाली. सेन्सेक्स 376 आणि निफ्टी निर्देशांक 71 अंकांनी खाली आला.
मुंबई शेअर बाजारात (बीएसई) मंगळवारी झालेल्या सत्रात सेन्सेक्स 0.60 टक्क्यांनी घटून 84 हजार 900 अंकांवर घसरला होता. निर्देशांकांत 500 अंकांहून अधिक घट झाली होती. बाजार बंद होताना काही प्रमाणात नुकसान भरून आल्याने सेन्सेक्स 0.44 टक्क्यांच्या घटीसह 85,063 अंकांवर विसावला. राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) निफ्टी निर्देशांक 0.50 टक्क्यांच्या घसरणीसह 26,124 अंकांवर गेला होता.
बाजार बंद होताना निफ्टी निर्देशांक 0.27 टक्क्यांच्या घसरणीसह 26,178 अंकांवर स्थिरावला.
बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांत अनुक्रमे 0.24 आणि 0.39 टक्क्यांनी घट झाली. बीएसई-30 निर्देशांकातील ट्रेंट, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी, कोटक महिंद्रा बँक आणि इंटरग्लोब एव्हिएशनच्या शेअर भावांत दोन ते नऊ टक्क्यांनी घट झाल्याने सेन्सेक्सचे सर्वाधिक नुकसान झाले.
सेन्सेक्सच्या तीनअंकी घसरणीमुळे बीएसईतील गुंतवणूकदारांनी दोन लाख कोटी रुपये गमावले. विदेशी संस्थांनी एक जानेवारीपासून झालेल्या तीन सत्रांत तीन हजार कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली असून, जुलै-2025 पासून 1.85 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली आहे.
मंगळवारी एका डॉलरचा भाव 90.21 रुपयांनी सुरू झाला. त्यात 90.09 रुपयांपर्यंत सुधारणा झाली होती. बाजार बंद होताना एका डॉलरचा भाव 90.16 रुपयांवर बंद झाला. सोमवारच्या तुलनेत रुपया 11 पैशांनी सुधारला.