

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा राजकीय पक्षांकडून धडाका सुरू आहे.अशावेळी नाक्यावर मिळेल ते कामगार घेवून राजकीय पक्षांकडून उमेदवारांचा प्रचार केला जात आहे.
मात्र दहिसर येथील वॉर्ड क्रमांक -1 मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील उमेदवाराचा प्रचार करताना एका कामगाराला शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. यावरून उबाठा व शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याने पोलीसांनी दोन्ही गटांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दहिसर येथील गणपत पाटील नगरमधील झोपडपट्टीतील एका चाळीत वॉर्ड क्र. 1 च्या उबाठा गटातील उमेदवार फोरम परमार आणि शिंदे गटाच्या उमेदवार रेखा यादव यांच्या लढत आहे. मंगळवारी उबाठा गटातील काही कार्यकर्त्यांकडून गणपत पाटीलनगर येथे प्रचार सुरू असताना शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी एकास मारहाण केली.
याप्रकरणी उबाठाने एमएचबी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर शिंदे गटाच्या उमेदवार रेखा यादव यांनीही उबाठा गटातील कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल केली. या संपूर्ण प्रकाराचा पोलीस तपास करत आहेत.