

मुंबई : मुंबईतील वायू प्रदूषणाबाबत उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर महापालिका प्रशासनाने प्रदूषण करणाऱ्या बांधकामांवर कडक निर्बंध लादले होते. त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या 557 बांधकामांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून 233 प्रकल्पांचे काम थांबवण्याची अंतिम नोटीस देण्यात आली आहे.
ही कारवाई 1 डिसेंबर ते 31 डिसेंबरदरम्यान करण्यात आली आहे. ज्या क्षेत्रात दोनशेपेक्षा वर हवा गुणवत्ता निर्देशांक गेला, तर संबंधित क्षेत्रामधील बांधकामे थांबविण्यात येतील, तसेच प्रत्येक बांधकामांवर वायू गुणवत्ता मापन संयंत्रे बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार आतापर्यंत एकूण 1,080 बांधकामस्थळी अशी संयंत्रे बसविली आहेत.
महापालिकेने वारंवार सूचना दिल्यानंतरही काही बांधकामांच्या परिसरातील एक्यूआय दोनशेच्या वर राहिल्याने महापालिका प्रशासनाने 557 बांधकामांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. यातील 233 बांधकामांना काम थांबवण्याच्या नोटिसा दिल्या आहेत.
सध्या मुंबईत एकूण 28 सतत वातावरणीय वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्रे आहेत. ही केंद्रे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार मोजमाप, कॅलिब्रेशन, गुणवत्ता हमी आणि डेटा प्रमाणीकरणासाठी राष्ट्रीय माणके व प्रोटोकॉलचे पालन करतात. तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे मान्यताप्राप्त मोबाईल ॲप हे सतत वातावरणीय वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्रावरील वास्तविक वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय ) प्रसारित करत असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.