

गोरेगाव : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने गोरेगाव विभागात विशेष वाहतूक निर्बंध लागू केले आहेत. हे निर्बंध मंगळवार, दि. 14 जानेवारी रोजी सकाळी 7 पासून गुरुवार, दि. 16 जानेवारी रोजी रात्री 12 पर्यंत लागू राहणार आहे.
या कालावधीत गोरेगाव पश्चिम भागातील उन्नतनगर क्रमांक 2 ते कांबुवाला रोड चौक या मार्गावर वाहतुकीत बदल करण्यात आला असून, सर्व वाहनांसाठी एकमार्गी वाहतूक लागू करण्यात आली आहे.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान ईव्हीएम मशीनची वाहतूक व सुरक्षितता लक्षात घेऊन हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. वाहतूक बदलामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांनी एम. जी. रोड आणि एस. व्ही. रोड या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, या कालावधीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.