महाड: संतप्त शिवसैनिकांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पुतळा जाळला! | पुढारी

महाड: संतप्त शिवसैनिकांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पुतळा जाळला!

महाड; श्रीकृष्ण द. बाळ/ इलियास ढोकले: भारतीय जनता पक्षाच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान सोमवारी संध्याकाळी महाड येथील पत्रकार परिषदेमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानाचे तीव्र पडसाद महाडमध्ये उमटले. संतप्त शिवसैनिकांनी आज राष्ट्रीय महामार्गावर नारायण राणे यांचा पुतळा जाळून महामार्ग अर्धा तास रोखून धरला.

यावेळी झालेल्या विविध पदाधिकाऱ्यांच्या भाषणात भविष्यकाळात भाजप नेत्यांना महाडमध्ये प्रवेश नाकारून कोणतीही सभा घेऊ देणार नसल्याचा इशारा देण्यात आला.

सोमवारी सायंकाळी झालेल्या महाड पीजी सीईटी हॉटेलमधील पत्रकार परिषदेमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या स्वातंत्र्य देण्यासंदर्भातील केलेल्या भाषणादरम्यान वादग्रस्त वक्तव्य केल होते. या वादग्रस्त विधानाचे तीव्र पडसाद काल रात्रीपासूनच महाडमध्ये पडण्यास सुरूवात झाली होती.

महाड शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने आज सकाळी साडेदहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सैनिक लोकप्रतिनिधी पदाधिकारी मोठ्या संख्येने एकत्रित येत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याचा निषेध केला. प्रारंभी तालुकाप्रमुख सुरेश महाडिक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातल्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाकडे कूच केले.

या ठिकाणी रस्त्यावर टायर टाकून राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुमारे अर्धा तास रोखून धरली. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘उद्धव ठाकरे अंगार है, बाकी सब भंगार है’ च्या घोषणांनी राष्ट्रीय महामार्ग दुमदुमून गेला.

याप्रसंगी महाड नगरसेवक बंटी पोटफोडे यांनी या वक्तव्याचा तीव्र निषेध करून राणेंसह भविष्यात भाजपला तीव्र विरोध करावा असे आवाहन केले.

महाड शहर प्रमुख नितिन पावले यांनी याप्रसंगी आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना नारायण राणे यांनी केलेले वक्तव्य हे शिवसैनिकांचा विषयी असलेला उद्रेक आहे. ही केवळ सुरुवात असून भविष्यात रायगडमधून परत अशा प्रकारची वक्तव्ये झाल्यास त्यांचा कडेलोट करू, असे यावेळी त्यांनी म्हटले.

भविष्यात असे कोणतेही वक्तव्य सहन करणार नाही

रायगडच्या पायथ्याशी असलेले शिवसेना पक्षाच्या प्रमुखाने याविषयी असे कोणतेही वक्तव्य भविष्यात सहन करणार नसल्याचा इशारा दिला. महाड तालुका प्रमुख सुरेश महाडिक यांनी नारायण राणे यांनी सोमवारी सायंकाळी केलेले वक्तव्य हे शिवसेनेला आव्हान देणारे असून भविष्यात नारायण राणेंसह भाजपच्या सर्व नेत्यांना महाडमध्ये सभाच काय तर प्रवेश देखील दिला जाणार नाही, असे संतप्त वक्तव्य केले.

सुमारे अर्धा तास मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्ग नाते खिंड येथे रोखून धरल्यानंतर स्थानिक महसूल व पोलिस प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या विनंतीनंतर शांततेच्या मार्गाने आयोजित करण्यात आले. आजचे शिवसेनेचे आंदोलन आजपुरते स्थगित करत असून अशा प्रकारचे वक्तव्य न थांबल्यास भविष्यात शिवसैनिकांचा होणाऱ्या उद्रेकाला आम्ही जबाबदार राहणार नाही असा इशारा दिला.

या आंदोलनाप्रसंगी तालुकाप्रमुख सुरेश महाडिक, जिल्हा सहसंपर्कप्रमुख विजय सावंत, शहरप्रमुख नितीन पावले, युवासेनाप्रमुख सिद्धेश पाटेकर, राजिप सदस्य सौ. निकिता ताटरे, मनोज काळीकर, संजय कचरे, माजी सभापती सदानंद मांडवकर, सभापती सौ. सपना

मालुसरे, नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेविका सौ शेडगे, सौ. शेठ, सुयोग पाटील, निलेश ताटरे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी डीवायएसपी नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

हेही वाचलंत का?

Back to top button