मंचर; पुढारी वृत्तसेवा : नारोडी (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील पती, पत्नीने झाडाला फाशी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसल्याचे घोडेगांव पोलिसांनी सांगितले.रात्री उशिरा हा प्रकार उघडकीस आला
रामदास भोरु जाधव (वय ५५) आणि त्यांची पत्नी मिनाबाई (वय ५०, रा. नारोडी खेबडशेत, ता. आंबेगाव, जि. पुणे) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.
घोडेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (दि.२३) हे दोघेही सरपण आणण्यासाठी डोंगरावर गेले होते. रामदास जाधव यांना राखी बांधण्यासाठी त्यांची बहीण त्याचवेळी आली होती. तिने रामदास यांचा मुलगा दत्ता याला फोन करुन तुझे आई-वडील घरी नसून त्यांना बोलावून घेऊन ये असे सांगितले.
दत्ता जाधव हे त्यानंतर त्यांच्या आई वडिलांना शोधण्यासाठी सोमवारी सायंकाळी डोंगरावर पाऊल वाटेने जात असताना वाटेच्या शेजारी असणाऱ्या झाडाच्या फांदीला दत्ता यांची आई मिनाबाई जाधव यांनी स्कार्फने गळफास घेतल्याचे दिसूले. त्याच झाडाच्या समोरील बाजूच्या फांदीला दत्ता यांचे वडील रामदास जाधव यांनी साडीने फाशी घेतलेली दिसून आली.
त्यानंतर दत्ता जाधव यांनी त्यांचा लहान भाऊ विशाल यास बोलावून घेतले. दोघांनी त्यांच्या आईवडिलांना झाडावरून खाली उतरवून ठेवले. त्यावेळी पोलिस पाटील आणि घोडेगाव पोलिसांनी मिनाबाई जाधव आणि रामदास जाधव यांना घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी नेले असता ते मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करुन मृतदेह मंगळवारी (दि. २३) कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आले आहेत. या प्रकरणी त्यांचा मुलगा दत्ता जाधव यांनी घोडेगाव पोलिस ठाण्यामध्ये सोमवारी सायंकाळी फिर्याद दिली आहे.
आईवडिलांमध्ये कौटुंबिक कारणावरुन नेहमी वाद होत होते. आईवडिलांच्या मृत्युबाबत कोणावरही संशय नसल्याचे तसेच त्याबाबत तक्रार नसल्याचे फिर्यादित म्हटले आहे, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरिक्षक जीवन माने यांनी दिली.