नारायण राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला; हायकोर्टात धाव | पुढारी

नारायण राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला; हायकोर्टात धाव

चिपळूण; पुढारी ऑनलाईन: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन रत्नागिरी सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. यामुळे राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वातंत्र्यदिनी भाषण करताना हिरकमहोत्सवी स्वातंत्र्यमहोत्सव असा उल्लेख केला. त्याचा संदर्भ देत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ‘कानाखाली आवाज काढला असता’ असे म्हणत वाद निर्माण केला.

राणे यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत राज्यभरात ठिकठिकाणी राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस आयुक्तांनी त्यांच्या अटकेचे आदेश दिले आहेत. राणे यांना अटक करण्यासाठी पोलिस पथक रवाना झाले आहे. तत्पुर्वी नारायण राणे यांनी जामीन अर्ज दाखल केला हाोता.

अटकेची शक्यता गृहीत धरून राणे यांनी रत्नागिरी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, कोर्टाने हा अर्ज फेटाळला आहे.

त्यानंतर राणे यांनी हायकोर्टातही जामिनासाठी अर्ज केल्याचे समजते. मात्र,आज सुनावणी झाली नाही तर राणे यांना अटक होण्याची शक्यता अधिक आहे.

राणे सध्या जनआशीर्वाद यात्रेत आहेत. या यात्रेचा प्रारंभ मुंबईतून झाला होता. तेव्हापासून ही यात्रा वादग्रस्त झाली आहे.

राणे यांच्या अटकेची शक्यता असल्याने देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळापूर्वी जनआशीर्वाद यात्रेबाबत माहिती दिली. या यात्रेचे नेतृत्व प्रवीण दरेकर आणि आशीष शेलार करतील असे जाहीर केले आहे.

प्रवीण दरेकर हे चिपळूणकडे रवाना झाले असून आमदार नितेश राणे हेही राणे यांच्या भेटीला आले आहेत. सध्या राणे चिपळूण येथील एका कार्यक्रमात होते. ते तेथेच थांबून आहेत.

येथे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून येथे पोलिस अधीक्षकांसह अन्य वरिष्ठ अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.

प्रचंड पोलिस बंदोबस्त

राणे सध्या संगमेश्वरजवळील गोळवली या गावात आहेत. येथे असलेल्या एका हॉलमध्ये राणे थांबून आहेत.

येथे भाजपचे आमदार प्रसाद लाड, नितेश राणे उपस्थित आहेत. येथे कुणीही कार्यकर्ते उपस्थित नाहीत.

मात्र, प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. येथे वरिष्ठ अधिकारी उपस्थित असून अतिरिक्त फौजफाटाही तैनात केला आहे.

हेही वाचलं का?

Back to top button