वृक्षारोपणासह झाडांचे संगोपन करणे अधिक गरजेचे; खासदार प्रकाश जावडेकर यांचे मत

वारजे येथील उद्यानात वृक्षारोपण करताना प्रकाश जावडेकर, जीत सिंग व मान्यवर.
वारजे येथील उद्यानात वृक्षारोपण करताना प्रकाश जावडेकर, जीत सिंग व मान्यवर.
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

'झाडे ही आपल्याला ऑक्सिजन देणारी बँक आहे. प्रत्येकाने लावलेल्या या झाडांचे संगोपन करणे अधिक गरजेचे आहे,' असे मत माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री खासदार प्रकाश जावडेकर यांनी केले. लायन्स क्लब ऑफ पुणे इको फ्रेड्सच्या पुढाकारातून लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी 2 व राज्याच्या वन विभाग आणि ट्रायडंट सर्व्हिस यांच्या संयुक्त विद्यमाने वारजे येथील वनउद्यानात वृक्षारोपण करण्यात आले.

या वेळी जावडेकर यांच्या हस्ते आंब्याचे झाड लावून उपक्रमाचे उद्घाटन झाले. आंबा, सागरगोटे अशी एकूण 1500 झाडे येथे लावण्यात येणार असून, त्यातील 100 झाडे रविवारी लावण्यात आली. उर्वरित झाडे जुलैमध्ये लावली जाणार आहेत. या वेळी लायन्सचे प्रांतपाल हेमंत नाईक, प्रधान वनसंरक्षक जित सिंग, भाजपचे संदीप बुटाला, सतीश राजहंस, संयोजक अनिल मंद्रुपकर, किशोर मोहोळकर, सौरभ सूर्यवंशी यांच्यासह विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. अनिल मंद्रुपकर यांनी प्रास्ताविक, तर किशोर मोहोळकर यांनी उपक्रमाविषयी माहिती दिली.

मराठा महासंघाच्या वतीने 'तळजाई'वर वृक्षारोपण

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तळजाई टेकडी येथे अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे शहर यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस नामदेव मानकर, पुणे शहर सरचिटणीस गणेश मापारी, सुशील पवार, जितेंद्र कोंढरे, संतोष अतकरे, आयोजक श्रीकांत मेमाणे आदी उपस्थित होते. 'प्रत्येक कुटुंबांनी एक झाड तरी लावले पाहिजे, पर्यावरण रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे,' असे मानकर यांनी या वेळी सांगितले.

'पर्यावरण रक्षणासाठी लोकसहभाग महत्त्वाचा'

टाकाऊ प्लास्टिक कचर्‍याचा पुनर्वापर करणे हा एक आपले पर्यावरण वाचवण्याचा उत्तम मार्ग आहे. पर्यावरणाचा र्‍हास थांबविण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे,' असे प्रतिपादन खासदार वंदना चव्हाण यांनी केले. 'जागतिक पर्यावरण दिना'चे औचित्य साधत 'वनराई' आणि 'गुडविल फाउंडेशन' यांच्या संयुक्त विद्यमाने 'पुनर्वापरायोग्य जुने कपडे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू संकलन केंद्रा'च्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

या वेळी वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, सचिव अमित वाडेकर, गुडविल फाउंडेशनचे अध्यक्ष कालिदास मोरे, कोहिनूर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक कृष्णकुमार गोयल आदी मान्यवर उपस्थित होते. धारिया म्हणाले की, योग्य कचरा व्यवस्थापन हे सामाजिक आणि पर्यावरणीय आरोग्य राखण्यासाठी गरजेचे आहे. लोकसहभागाने या समस्येवर तोडगा काढणे ही एक काळाची गरज आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news