काश्मिरींना राखीव जागा ठेवणारे महाराष्ट्र पहिले; उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती | पुढारी

काश्मिरींना राखीव जागा ठेवणारे महाराष्ट्र पहिले; उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती

पुणे : पुढारी वृत्तसेवा

‘काश्मिरी पंडितांच्या मुलांना शिक्षणासाठी राखीव जागा ठेवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे,’ अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. काश्मिरी पंडित विस्थापित झाले असतील किंवा तिथेच असतील, तरी त्यांच्या मुलांना जर महाराष्ट्रात शिक्षण घ्यायचे असेल, तर त्यांच्यासाठी राखीव जागा ठेवण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वीच घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सामंत म्हणाले, की महाविकास आघाडी सरकारच्या निर्मितीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काश्मिरी विद्यार्थ्यांना राज्यात शिक्षणासाठी राखीव जागा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या काश्मीरमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीमुळे काश्मिरी पंडित आणि त्यांची मुले काश्मीरमधून इतर ठिकाणी जात आहेत. त्यांना जर महाराष्ट्रात यायचे असेल, तसेच त्यांच्या मुलांना या ठिकाणी शिक्षण घ्यायचे असेल, तर महाविकास आघाडी सरकार त्यांना मदत करणार आहे. त्यांचे शैक्षणिक नुकसान कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही.

युक्रेनच्या विद्यार्थ्यांचा विचार केला जातो, अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांचा विचार केला जातो, मग काश्मीरच्या विद्यार्थ्यांचा विचार का करायचा नाही. त्यांचे शिक्षण व्हावे, हीच प्रामाणिक भावना आहे. त्यामध्ये कोणतेही राजकारण करायचे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या काश्मिरी विद्यार्थ्यांसाठी साधारण 5 टक्के जागा आरक्षित ठेवल्या जातात. यामध्ये वाढ करण्याची गरज पडली किंवा त्यांना कोणत्या विद्यापीठात समायोजित करायचे ठरले, तर त्यासाठी योग्य ते प्रारूप तयार केले जाईल, असेदेखील सामंत यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा 

सीना धरणात 30 टक्के उपयुक्त पाणीसाठा, शेतकरी चिंतामुक्त

Dhule : शेतकऱ्यांसाठी मान्सूनपूर्व नियोजन करा ; प्रहारचे तहसीलदारांना निवेदन

टोमॅटो खात आहेत भाव ! श्रीरामपूर बाजार समितीत 55 रुपये किलो

Back to top button