
धुळे, (पिंपळनेर) पुढारी वृत्तसेवा
कोणताही आर्थिक आधार नसणाऱ्या शेतकऱ्यांचा विचार करत शासनाने पीक कर्जासाठी राष्ट्रीयकृत बँकांना आदेश द्यावे, मशागत व पेरणीसाठी सुलभ रित्या पीक कर्ज मंजूर झाले तर शेतकरी स्वाभिमानाने शेती करेल. तसेच खतांचा व बी-बियाण्यांचा साठेबाजार करून शेतकऱ्यांना लुटण्याचा प्रयत्न करू नये. असे केल्यास दुकानदारांचा परवाना रद्द करून गुन्हे दाखल करावेत अशी मागणी प्रहारचे जयेश बावा यांनी तहसील गोपाल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
मॉन्सूनच्या धाकाने शेतकरी चिंताग्रस्त दिसत आहे. परवानाधारक दुकानदारांना पूर्व सूचना द्याव्यात जेणेकरून शेतकऱ्यांची लूट व पिळवणूक होणार नाही. निसर्गावर अवलंबून न राहता शेतकऱ्यांसाठी जलसाठा राखून ठेवावा व दुबार पेरणी करण्याची वेळ येऊ नये यासाठी पेरणी योग्य वेळेस कधी करायची याची पूर्व कल्पना तालुक्यातील शेतकऱ्यांना द्यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका विभाग प्रमुख जयेश बावा, तालुका उपाध्यक्ष संजय अहिरराव, काटवान परिसर अध्यक्ष राजू भदाणे, भिला कोळेकर, रामा कोळेकर, नाना कोळेकर, धनराज कोळेकर, सुभाष बोरकर, महेंद्र थोरात, संतोष कोळेकर, वैभव कापडणीस, चेतन खैरनार आदी उपस्थित होते.