मनसे इंजिनाची धडक कोणाला बसणार?; राज ठाकरेंनी बदलली रणनिती!

मनसे इंजिनाची धडक कोणाला बसणार?; राज ठाकरेंनी बदलली रणनिती!
Published on
Updated on

पुणे; ज्ञानेश्वर बिजले : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) खरी ताकद आहे ती शहरात. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महापालिकांच्या शहरांना भेटी देण्याचा धडाका लावला आहे. सध्या त्यांचा जोर पक्षबांधणीवर असला, तरी मनसेच्या सुसाट सुटलेल्या या इंजिनाची धडक कोणाला बसणार, याकडेच अन्य राजकीय पक्षांचेही लक्ष लागले आहे.

मनसेची एकमेव ताकद म्हणजे राज ठाकरे यांचे घणाघाती भाषण. लाव रे तो व्हिडिओ, असे ते म्हणताच, गेल्या निवडणुकीत श्रोत्यांच्या नजरा खिळून गेल्या होत्या. त्यानंतर होत असे ठाकरे यांचा थेट जीवघेणा शाब्दीक हल्ला. मात्र, मनसेच्या कार्यकर्त्यांची ताकद कमी पडल्याने, त्याचा फायदा विरोधकांनाच झाला.

कारण उमेदवारामागे कार्यकर्त्यांचे संघटन नव्हते. मनसेची पाटी कोरीच राहिली. बहुदा आता ते लक्षात घेत ठाकरे यांनी संघटना बांधणीवर लक्ष केंद्रीत केले आहे.

ठाकरे यांची बदललेली रणनिती

ठाकरे गेल्या महिन्यात तीनदा पुण्याला आले. तसेच ते नाशिकला गेले होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना भरपूर वेळ दिला. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. पूर्वी असे घडल्याचे फारसे ऐकिवात नाही. त्यांनी यावेळी केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष अथवा राज्यातील महाविकास आघाडीवरही हल्ला करण्याचे टाळले. ते बोलतात, तीच बातमी होते. मात्र, ते सध्या शाब्दीक हल्ले करण्याचे टाळत असल्याचे जाणवले.

त्यांच्या पुणे व नाशिकमधील वाढलेल्या भेटी, तसेच मुंबईतील मनसेच्या वाढलेल्या हालचालींकडे अन्य राजकीय पक्षाचे नेतेही बारकाईने नजर ठेवून आहेत. मराठवाडा व विदर्भातील जिल्हा प्रमुखांची बैठकही ठाकरे यांनी पुण्यात घेतली.

पक्ष संघटना बळकट करताना, त्यांनी प्रभागप्रमुखाऐवजी शाखा प्रमुख नियुक्त करण्याचे नवीन धोरण स्वीकारले. त्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका घेतल्या. सध्या पक्षात कोण कार्यरत आहे, त्याचा अंदाज पक्षश्रेष्ठींना घेता आला. त्या भागातील राजकीय स्थिती, समस्या यांची माहिती संकलित झाली. त्याचा उपयोग उमेदवार निवड, तसेच प्रचाराची रणनिती आखताना होईल.

महापालिका निवडणुका हेच लक्ष्य

मनसेचे सरचिटणीस अनिल शिदोरे दै. पुढारीशी बोलताना म्हणाले, राज्यात पंधरा महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यात पहिल्यांदा मुंबई, पुणे, नाशिक आणि ठाणे यांवर आम्ही लक्ष केंद्रीत केले. त्यानंतर, या भागातील सहा महापालिका आणि शेवटच्या टप्प्यात उर्वरीत पाच महापालिकांवर लक्ष देणार आहे. पक्षबांधणी झाल्यानंतर आम्हाला सध्याच्या आमच्या ताकदीचा अंदाज येईल.

चांगली ताकद असलेल्या वॉर्डात मनसेच्या उमेदवारांमागे बळ उभे करून, अधिकाधिक जागा मिळविण्याची रणनिती आखण्यात येईल.
मुंबईत त्यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाहणीचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे. त्यासाठी तेथील स्थानिक मनसे नेत्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली. पुण्यात अनिल शिदोरे, बाबू वागसकर, वसंत मोरे, हेमंत संभूस, गणेश शिरोळे, अजय शिंदे, रणजीत शिरोळे यांच्यासह स्थानिक नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. नाशिकमध्ये अमित ठाकरे आणि संदीप देशपांडे लक्ष घालत आहेत. या सर्वांचे प्राथमिक अहवाल मिळाल्यानंतर, पुढील दिशा ठरविण्यात येईल.

भाजपसोबत युती होणार आहे का, यासंदर्भात विचारणा केली असता, शिदोरे म्हणाले, की सध्या काहीही ठरलेले नाही. आम्ही आत्मनिरीक्षण करीत आहोत. पक्षाची स्वतःची ताकद, त्याची रचना याकडेच आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. पुणे. नाशिक, मुंबई, ठाणे येथे अनेक वॉर्डात पक्षाला चांगले पाठबळ आहे. ताकदवान कार्यकर्ते आहेत. नवीन वॉर्डरचना कशी होते, ते पाहिल्यानंतर या कार्यकर्त्यांच्या मागे ताकद उभी करण्याचा निर्णय घेता येईल.

भाजप – मनसेची युती होणार का?

राज्यातील राजकीय समिकरणे सध्या पूर्ण बदलली आहेत. मुंबईत शिवसेना व भाजप यांच्यात काट्याची टक्कर होईल. अशा वेळी मनसेचे उमेदवार कोणाचे नुकसान करणार, किती ठिकाणी विजयी होणार, ते महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे भाजपला मनसेची साथ हवी आहे.

कारण, मनसेमुळे सर्वाधिक नुकसान भाजपचेच होणार आहे. पुण्यात पाहिल्यास गेल्यावेळी मनसेच्या जागा भाजपच्या झोळीत पडल्या. आता, लढतीत भाजपला पुणे-मुंबईत जागा कमी होणे परवडणारे नाही. मात्र, युती केल्यास, भाजपला मनसेसाठी त्यांच्या नगरसेवकांच्या काही जागा सोडून तडजोड करावी लागेल. अशा द्विधा स्थितीत भाजपचे पक्षश्रेष्ठी सापडणार आहेत.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : अफगाणिस्तान : काबूल विमानतळावर उडत्या विमानातून तिघेजण कोसळले, टायर पकडून चालले होते लटकत |

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news