उद्धव ठाकरे देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये चौथे | पुढारी

उद्धव ठाकरे देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये चौथे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देशातील पहिल्या पाच लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये समावेश झाला आहे. कोरोना काळात संयमाने राज्याचा गाडा हाकणारे मुख्यमंत्री ठाकरे यांना लोकप्रिय मुख्यमंत्र्यांत चौथे स्थान मिळाले आहे.

इंडिया टुडेने नुकत्याच केलेल्या सर्व्हेत देशातील 11 लोकप्रिय मुख्यमंत्र्यांची यादी तयार करण्यात आली असून, पहिल्या पाचात भाजपच्या एकाही मुख्यमंत्र्याचा समावेश नाही. 11 जणांच्या यादीत भाजपच्या केवळ दोनच मुख्यमंत्र्यांना स्थान मिळवता आले आहे.

देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या नावांच्या यादीत पहिले स्थान तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी पटकावले आहे. दुसर्‍या क्रमांकावर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक, तिसरे स्थान केरळचे मुख्यमंत्री पिनराईन विजयन, चौथे स्थान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तर पाचवे स्थान पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांना मिळाले आहे.

भाजपचे आसाममधील मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अकरा जणांच्या यादीत स्थान मिळाले आहे. मात्र, पहिल्या पाचमध्ये भाजपच्या एकाही मुख्यमंत्र्याचा समावेश नाही. योगी आदित्यनाथ यांना तर या सर्व्हेत केवळ 29 टक्के लोकांनी पसंती दिल्याचे इंडिया टुडेच्या मूड ऑफ द नेशन सर्व्हेत स्पष्ट झाले आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत मोदींच्या लोकप्रियतेत घट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता एकाच वर्षात 66 टक्क्यांवरून 24 टक्क्यांपर्यंत खाली घसरली आहे. ऑगस्ट 2020 मध्ये 66 टक्के लोकांनी मोदींना पसंती दर्शविली होती. जानेवारी 2021 मध्ये 38 टक्के, तर ऑगस्ट 2021 मध्ये म्हणजेच आता चालू महिन्यात केवळ 24 टक्के लोकांनी मोदींना पसंती दिली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत सातत्याने घसरण होत असल्याचे इंडिया टुडेच्या मूड ऑफ द नेशन या सर्व्हेत समोर आले आहे.

Back to top button