बारामतीत 15 लाखांचा ऑनलाइन गंडा; गॅस एजन्सीच्या आमिषाने फसवणूक

बारामतीत 15 लाखांचा ऑनलाइन गंडा; गॅस एजन्सीच्या आमिषाने फसवणूक

बारामती : पुढारी वृत्तसेवा : इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमधून बोलत असल्याचे सांगत इंडेन गॅस एजन्सी मिळवून देण्याचे आमिष दाखवत येथील एकाची सुमारे 14 लाख 72 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात पंकजकुमारसह अन्य एकाविरोधात फसवणुकीसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमोल एकनाथ मोरे (रा. एमआयडीसी, बारामती) यांनी याबाबत फिर्याद दिली. दि. 9 नोव्हेंबर 2021 ते 26 नोव्हेंबर 2021 या कालावधीत ही घटना घडली. फिर्यादीला गॅस एजन्सी सुरू करायची होती. त्यासाठी ते इंटरनेटवर माहिती पाहत असताना त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी व्यक्तीने फोन केला. त्याने पंकजकुमार नाव सांगत तो इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमधून बोलत असल्याचे सांगितले.

गॅस एजन्सी सुरू करायची आहे का? अशी विचारणा त्याने केली. त्यावर फिर्यादीने होकार दिल्यावर त्याने इंडेन गॅस एजन्सी देतो, असे आश्वासन दिले. त्यासाठी त्याने फिर्यादीच्या व्हॉट्सअ‍ॅपवर कागदपत्रांची यादी पाठवली. दि. 10 ऑक्टोबर 2021 रोजी फिर्यादीने आधार, पॅन, घरपट्टी आदी कागदपत्रे पाठवून दिली. त्यानंतर पंकजकुमारने रजिस्ट्रेशन फीपोटी 18,500 रुपये भरायला सांगितले.

फिर्यादीने त्याने दिलेल्या खात्यावर ते भरले. दुसर्‍या दिवशी त्याने फिर्यादीच्या मेल आयडीवर मेल करीत रकमेची इन्व्हॉईस कॉपी पाठवली. 18 ऑक्टोबर रोजी त्याने एजन्सी मिळाल्याचे कंपनीच्या बनावट सही-शिक्क्यांचे पत्र मेलवर पाठविले. कन्फर्मेशन सर्टिफिकेटसाठी 67,500 रुपये भरायला सांगितले. ते फिर्यादीने भरले. त्याचीही पावती व सर्टिफिकेट त्याने मेल केले.

26 ऑक्टोबर रोजी त्याने फोन करीत अ‍ॅग्रीमेंट रिपोर्टसाठी 1 लाख 47 हजार रुपये. त्यानंतर 1 नोव्हेंबर रोजी लायसन्स फीपोटी 1 लाख 29 हजार रुपये भरण्यास सांगितले. ती रक्कमही फिर्यादीने भरली. त्यानंतर 5 नोव्हेंबर रोजी त्याने गॅस सिलिंडरच्या डिपॉझिटसाठी 3 लाख 34 हजार भरण्यास सांगितले. त्याच दिवशी त्याने पैसे भरल्याची पावती मेल केली.

दि. 15 नोव्हेंबर रोजी एनओसी व इन्शुरन्ससाठी 2 लाख 45 हजार रुपये भरण्यास सांगितले. फिर्यादीने ते भरल्यावर दि. 17 रोजी त्याची पावती मेलवर पाठविण्यात आली. 20 नोव्हेंबर रोजी लँड व्हिजिट फी व अकाउंट सेटलमेंटसाठी 2 लाख 10 हजार रुपये भरण्यास सांगितले. ती रक्कम भरल्यावर फिर्यादीने फोन केला असता अन्य व्यक्तीने फोन घेत पंकजकुमार हे मीटिंगमध्ये असल्याचे तसेच त्यांनी आणखी 1 लाख 42 हजार रुपये भरण्यास सांगितल्याचे कळविले. त्यानुसार ही रक्कमही भरली गेली.

25 नोव्हेंबर रोजी पंकजकुमारने. तुम्ही भरलेली 75 टक्के रक्कम परत मिळणार असल्याचे सांगून त्यापोटी जीएसटी म्हणून 1 लाख 44 हजार भरण्यास सांगितले. तीसुद्धा फिर्यादीकडून भरण्यात आली. दि. 26 रोजी त्याने लँड व्हिजिटला येत असल्याचे कळवत पुण्यात हॉटेलला थांबलो असून, त्याचे भाडे 35 हजार रुपये पाठविण्यास सांगितले.

फिर्यादीने तेसुद्धा भरले. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर संपर्क केले असता तो बंद लागला. फिर्यादीला संशय आल्याने मुंबईत जात कंपनीच्या ऑफिसमध्ये चौकशी केली. त्या वेळी तेथे अशा नावाची कोणीही व्यक्ती नसल्याचे तसेच ज्या खात्यावर पैसे भरले ते कंपनीचे खाते नसल्याचे सांगण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news