अंथुर्णे येथे पालखी मुक्कामाची तयारी सुरू

अंथुर्णे येथे पालखी मुक्कामाची तयारी सुरू

वालचंदनगर : पुढारी वृत्तसेवा:  अंथुर्णे (ता. इंदापूर) येथे संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या मुक्कामाची जय्यत तयारी सुरू असून पालखी मुक्कामामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. येथील पालखी तळासाठी तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासनाने 25 एकर जागा दिली असून शासनाने सुमारे दीड कोटी रुपये खर्चून पालखी मुक्कामासाठी प्रशस्त इमारत, संपूर्ण पालखी तळाला दगडी भिंत व मुख्य प्रवेशद्वाराच्या ठिकाणी स्वागत कमान उभारली आहे. त्यामुळे पालखी तळ परिसराची शोभा वाढली आहे.

याशिवाय काही सामाजिक संस्थांनी पालखी तळावरील रस्त्यांच्या बाजूने लावलेली रोपटी आता मोठी झाली असल्याने प्रसन्न वातावरण बनले आहे. दरम्यान येथील सरपंच लालासाहेब खरात यांनी सांगितले की, पालखी तळाची साफसफाई करण्यास सुरुवात केली असून वारकर्‍यांसाठी पिण्याचे स्वच्छ पाणी, अंघोळीसाठी मुबलक पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. जवळपास 800 हून अधिक फिरती शौचालये उपलब्ध करण्यात येणार आहेत.

याशिवाय पालखी सोहळ्यामध्ये दर्शनबारीची सुटसुटीत व्यवस्था करणार आहे. पालखी मुक्कामाच्या दिवशी वारकर्‍यांची भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच पालखी सोहळ्याचे गावाच्या वेशीवर जंगी स्वागत करणार आहे. या सर्व तयारीसाठी ग्रामपंचायतीचे सर्व आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक योगदान देत असल्याचे खरात यांनी सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news