सोपानकाका पालखीसाठी केंजळेंची बैलजोडी

सोपानकाका पालखीसाठी केंजळेंची बैलजोडी

सोमेश्वरनगर, पुढारी वृत्तसेवा:

माझ्या बापाची मिराशी गा देवा !
तुझी चरण सेवा पांडुरंगा !

या संत तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे सोरटेवाडी (ता. बारामती) येथील केंजळे परिवाराच्या चौथ्या पिढीने संत सोपानकाका पालखी सोहळ्यासाठी स्व:मालकीची बैलजोडी पाठविण्याची परंपरा जपली आहे. शनिवारी (दि. 18) मान्यवरांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करून बैलजोडी सासवडकडे पाठविण्यात आली.

संत सोपानकाका पालखीचा रथ ओढण्याचा मान सुमारे 125 वर्षांपासून या परिवाराला मिळत आहे. पंढरपूर एकादशीला पादुकांना स्नान घालणे आणि पालखी सोरटेवाडीत आल्यानंतर महाअभिषेक करणे याचाही मान केंजळे परिवाराला आहे. सोरटेवाडी येथील केंजळेवाड्यात मान्यवरांच्या व ग्रामस्थांच्या उपस्थितीत बैलजोडीची विधिवत पूजा करण्यात आली.

या वेळी सोहळाप्रमुख त्रिभुवन महाराज गोसावी उपस्थित होते. गेल्या वर्षी कोरोना पार्श्वभूमीवर पालखी सोहळा रद्द झाला होता. मात्र, परंपरेला खंड पडू न देता बैलजोडीचे केंजळेवाड्यात पूजन करून बैलजोडी पुन्हा वाड्यात बांधण्यात आली होती. शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे, बांधकाम सभापती प्रमोद काकडे, जिल्हा बँकेचे संचालक संभाजी होळकर, 'सोमेश्वर'चे संचालक संग्राम सोरटे, सरपंच दत्तात्रय शेंडकर, तसेच केंजळे परिवारातील नितीन कुलकर्णी, विकास केंजळे, संजय कुलकर्णी, अनिल बडवे, अरुंधती केंजळे, रागिणी कुलकर्णी, माधवी केंजळे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

शनिवारी पंढरपूरकडे प्रस्थान

संत सोपानकाका पालखी सोहळा शनिवारी (दि. 25) सासवडवरून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. पालखीरथासाठी एक आणि नगारा वाहून नेण्यासाठी येथील नितीन कुलकर्णी आणि विकास केंजळे यांनी होळ (ता. बारामती) येथील होळकर कुटुंबाची दोन बैलजोडी सुमारे 3 लाख रुपयांना खरेदी केली आहे. सुमारे 125 वर्षांपूर्वी सोपानकाका पालखी सोहळा आकारास आला.

सुरुवातीला भोई समाजातील लोक पालखी वाहून नेत असत. काही वर्षांनी बैलांच्या साहाय्याने पालखी ओढून नेता येईल असा रथ तयार करण्यात आला. सोरटेवाडी येथील कै. बापूसाहेब बाळाजी केंजळे सोपानकाकांच्या समाधीचे सेवेकरी होते. त्यांच्याकडे सुरुवातीला हा मान होता. त्यानंतर त्यांच्या चौथ्या पिढीने ही परंपरा सुरू ठेवली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news