पुणे : पुढारी वृत्तसेवा : सोन्याचे बिस्किट देण्याची बतावणी करीत एका 65 वर्षीय आजीचा 65 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी लोणी काळभोर येथील एका ज्येष्ठ महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघा अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 13 जून रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास हडपसर गाडीतळ बस डेपोसमोर घडली.
फिर्यादी आजी गाडीतळ बस डेपोसमोर थांबल्या होत्या. त्यावेळी आरोपींपैकी एकाने त्यांच्याजवळ येऊन खाली वाकून काही तरी सापडल्याचे सांगितले. त्याचवेळी दुसर्याने 12 तोळे सोने मिळाल्याचे म्हटले. तिसर्याने ते सोने आजीला तुमच्या पिशवीतून पडल्याची बतावणी केली. तिघांनी आजींना प्रलोभनाच्या जाळ्यात खेचून बाजूला नेले.
तेथे त्यांना सोन्याचे बिस्किट देतो, असे सांगून पैशाची मागणी केली. मात्र, आजीने रोख पैसे नसल्याचे सांगितले. त्यावेळी आरोपींनी आजींना पिवळ्या रंगाचा धातूचा तुकडा देऊन त्या बदल्यात त्यांच्याकडील सोन्याचे गंठण, अंगठी असा 65 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. आजींना जेव्हा तो धातूचा तुकडा पितळी आहे, हे लक्षात आल्यानतर त्यांना फसवणूक झाल्याचे समजले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कविराज पाटील करीत आहेत.