पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च-एप्रिलमध्ये घेतलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा एक संधी देण्यासाठी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. दहावीची ही परीक्षा 27 जुलै ते 12 ऑगस्ट, तर बारावीची परीक्षा 21 जुलै ते 12 ऑगस्ट या कालावधीत होईल, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.

बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्य मंडळाने पुरवणी आणि श्रेणी सुधार परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 10 जूनपासून सुरू केली आहे, तर आता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 20 जूनपासून सुरू करण्यात येणार आहे. बारावीची सर्वसाधारण आणि द्विलक्ष्यी विषयांची पुरवणी परीक्षा 21 जुलै ते 12 ऑगस्ट,

बारावीची व्यवसाय अभ्यासक्रमाची परीक्षा 21 जुलै ते 8 ऑगस्ट आणि दहावीची पुरवणी परीक्षा 27 जुलै ते 12 ऑगस्ट या कालावधीत होईल. बारावीची प्रात्यक्षिक, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 20 जुलै ते 8 ऑगस्ट, तर दहावीची प्रात्यक्षिक, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 26 जुलै ते 8 ऑगस्ट या दरम्यान होणार आहे.

72 हजार 462 विद्यार्थी पुरवणीसाठी पात्र

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा आणि श्रेणी सुधारू इच्छिणार्‍या श्रेणी सुधार परीक्षा घेतली जाते. यासाठी दहावीचे 72 हजार 462 विद्यार्थी पात्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये पुनर्परीक्षेसाठी 52 हजार 749 तर एटीकेटीचे 19 हजार 713 विद्यार्थी आहेत. यामध्ये पुणे – 12 हजार 151, नागपूर – 6 हजार 663, औरंगाबाद – 9 हजार 384, मुंबई- 17 हजार 156, कोल्हापूर – 2 हजार 928, अमरावती- 7 हजार 695, नाशिक- 10 हजार 657, लातूर – 5 हजार 444, कोकण – 384 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांचे समुपदेशन ऑनलाइनच

राज्य मंडळाने दहावीच्या परीक्षेवेळी विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यासाठी ऑनलाइन समुपदेशन सेवा सुरू केली होती. मात्र, निकाल झाल्यानंतर मानसिक दडपणाखाली असलेल्या विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी ऑनलाइन समुपदेशन सेवा सुरू ठेवली जाणार आहे. हे समुपदेशन निकालानंतर आठ दिवस सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत विनाशुल्क करण्यात येईल. समुपदेशकांचे भ—मणध्वनी राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याचे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news