BAN vs WI : बांगलादेशी सहा फलंदाजांना भोपळा | पुढारी

BAN vs WI : बांगलादेशी सहा फलंदाजांना भोपळा

अँटिग्वा ; वृत्तसंस्था : वेस्ट इंडिज दौर्‍यावर असलेल्या बांगलादेश (BAN vs WI) संघाच्या नावावर एक नकोसा विक्रम जमा झाला आहे. पहिल्याच कसोटीच्या पहिल्या दिवशी बांगलादेशचे सहा फलंदाज पहिल्या डावात शून्यावर बाद झाले. एखाद्या संघाचे सहा फलंदाज शून्यावर बाद होण्याची ही कसोटीमधील पहिली वेळ नाही, पण बांगलादेशच्या संघासोबत एका महिन्याच्या आत दोन वेळा असे झाले आहे.

याआधी 24 मे रोजी मीरपूर येथे झालेल्या कसोटीत श्रीलंकेने बांगलादेशच्या सहा फलंदाजांना शून्यावर बाद केले. विशेष म्हणजे तेव्हा 6 फलंदाज शून्यावर बाद होऊन देखील बांगलादेशने 365 धावा केल्या होत्या, पण यावेळी त्यांना फक्त 103 धावा करता आल्या. कसोटीत एका डावात 6 फलंदाज शून्यावर बाद होण्याची बांगलादेशची ही तिसरी वेळ आहे.

बांगलादेशचा संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौर्‍यावर आहे. दोन्ही संघांत दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी बांगलादेशचा पहिला डाव 103 धावांवर गुंडाळला. बांगलादेशची सुरुवात अतिशय खराब झाली. 3 धावांवर त्यांनी 2 विकेटस् गमावल्या होत्या. त्यानंतर 16 धावांवर तिसरी विकेट गमावली. सलामीच्या फलंदाजांपैकी महमुदुल हसन ज्वॉय, नजमुल हुसैन शंटो आणि मोमीनुल हक शून्यावर माघारी परतले. (BAN vs WI)

46 धावांवर बांगलादेशने 6 विकेटस् गमावल्या होत्या, पण त्यानंतर कर्णधार शाकिब अल हसनने डाव संभाळला. त्याने 67 चेंडूंत 51 धावा केल्या. शाकिबला अन्य फलंदाजांची साथ मिळाली नाही त्यामुळे संघाचा डाव 103 वर संपुष्टात आला. बांगलादेशच्या फक्त तिघा फलंदाजांना दुहेरी धावसंख्या करता आली. वेस्ट इंडिजकडून जायडन सील्स आणि अल्जारी जोसेफ यांनी प्रत्येकी 3 तर केमार रोच आणि कायले मेयर्स यांनी प्रत्येकी 2 विकेटस् घेतल्या.

Back to top button