भारतीय खेळाडू स्वार्थी वागले होते : टीम पेन

भारतीय खेळाडू स्वार्थी वागले होते : टीम पेन

सिडनी : वृत्तसंस्था : ऑस्ट्रेलियात 2020-21 मध्ये झालेली बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेत भारताने जोरदार कमबॅक करत ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीत मात दिली. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील कसोटी संघाने जबरदस्त कामगिरी करून दाखवली. या मालिकेतील तिसर्‍या सामन्यापूर्वी कोरोनाचे बायोबबल सोडून तीन-चार भारतीय खेळाडू हॉटेलमध्ये गेल्याचे फोटो व्हायरल झाले होते. या घटनेमुळे मालिका रद्द करण्याची वेळ आली असती, असा आरोप ऑस्ट्रेलियाचा तत्कालिन कर्णधार टीम पेन याने केला आहे. टीम पेन म्हणाला की, त्या चार-पाच खेळाडूंनी संपूर्ण कसोटी मालिका धोक्यात आणली. तेही एक बाऊल नान्डोज चीप्स आणि अशाच काही पदार्थांसाठी. त्यावेळी मला ते खूप स्वार्थी वाटले होते.

या मालिकेतील हिरोंवर व्हूट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'बंदो में था दम' ही माहितीपट वजा मालिका दाखवण्यात येत आहे. या मालिकेत टीम पेनेने एका घटनेचा उल्लेख करत भारताच्या चार ते पाच खेळाडूंमुळे संपूर्ण कसोटी मालिका धोक्यात आली होती, असे वक्तव्य केले. तिसर्‍या सिडनी टेस्टपूर्वी काही भारतीय स्टार खेळाडू रेस्टॉरंटमध्ये गेल्याचे आढळून आले होते. त्यावेळी हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यात रोहित शर्मा, शुभमन गिल, ऋषभ पंत, पृथ्वी शॉ आणि नवदीप सैनी हे मेलबर्नच्या विजयानंतर एका रेस्टॉरंटमध्ये गेले होते.

यावर पॅट कमिन्स म्हणाला की, 'यामुळे काही खेळाडूंना राग आला होता. विशेषकरून ज्यांनी ख्रिसमस त्यांच्या कुटुंबीयांशिवाय घालवावा लागला होता. अनेक खेळाडूंनी काही ना काही त्याग केला होता. जेणेकरून ही कसोटी मालिका निर्विघ्नपणे पार पडावी. मात्र समोरचा संघ कोरोनाचे नियम गांभीर्याने घेत नव्हता.'

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news