पुणे : व्यापक वापर केल्यानंतर कळेल ‘मोल्नुपिरावीर’ची उपयुक्‍तता

पुणे : व्यापक वापर केल्यानंतर कळेल ‘मोल्नुपिरावीर’ची उपयुक्‍तता

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोरोनावरील विषाणूविरोधी मोल्नुपिरावीर (अँटिव्हायरल) औषध हे परदेशात झालेल्या चाचण्यांवरून रुग्णांवर 88 टक्के प्रभावी ठरले आहे. त्यामुळे हे औषध तयार करण्यासाठी भारतीय फार्मा कंपन्या सरसावल्या आहेत. मात्र, या औषधाची चाचणी परदेशात झाली; तीही मर्यादित रुग्णांवर झाली आहे. त्याची सध्या परिणामकारकता चांगली दिसून आली असली तरी मोठ्या प्रमाणात वापरल्यानंतरच त्याचे खरे परिणाम पुढे येतील, असे मत तज्ज्ञांनी व्यक्‍त केले आहे.

मॉल्नुपिराविर तोंडावाटे घ्यायचे विषाणूविरोधी औषध

मॉल्नुपिराविर हे तोंडावाटे घ्यायचे विषाणूविरोधी औषध आहे. ते कोरोनासह इतर आरएनए विषाणूंची वाढ रोखते. त्यामुळे कोरोना विषाणूंची संख्या शरीरात कमी होते आणि रुग्ण लवकर बरा होतो. परंतु त्यासाठी ते कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यावर पहिल्या तीन दिवसांत देणे गरजेचे ठरते. या औषधाला याआधी 'यूके मेडिसिन्स अँड हेल्थकेअर प्रोडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सी' (एमएचआरए) आणि 'यूएस फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन' (यूएस एफडीए) कडून सौम्य ते मध्यम कोरोना रुग्णांवर उपचारासाठी मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान, या औषधाच्या उत्पादनाला भारत औषध महानियंत्रक कार्यालयाने परवानगी दिल्यानंतर निर्मितीसाठी कंपन्या सरसावल्या आहेत. सन फार्मा, नॅटको, रेड्डीज व विविध कंपन्या हे औषध बनवण्याच्या प्रक्रियेत आहेत. म्हणून सध्या हे औषध खूप चर्चेत आहे. तर मॅनकाइंड फार्मा कंपनीने हे औषध मोलुलाईफ नावाने बाजारात आणले आहे. त्याची किंमत 1,399 ठेवण्यात आली आहे. दरम्यान, हे औषध उपचारांमध्ये गेमचेंजर ठरेल, असे कंपन्यांनी म्हटले आहे.

मात्र, आपल्याकडे प्रत्यक्ष वापर केल्यावरच त्याची खरी क्षमता सिद्ध होईल. त्यामुळे सध्या हे औषध प्रभावी वाटते; मात्र, फार सांगता येत नाही, असे बीजे वैद्यकीय महाविद्यालयाचे सूक्ष्म जीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी सांगितले.

याआधी वापरातील अँटिव्हायरल औषधे

याआधी कोरोनावर अँटिव्हायरल औषध म्हणून हायड्रोक्सिक्लोरोक्‍विन, अ‍ॅझिथ-ोमायसिन, आयव्हरमेक्टिन ही औषधे वापरली गेली. त्यानंतर फॅविपिराविर, रेमडेसिविर, टॉसिलीझुमाब, कॉकटेल अँटिबॉडी, रिटानाविर ही औषधे वापरली गेली. ही अँटिव्हायरल अजूनही वापरात आहेत. दरम्यान, मॉल्नुपिराविर हे औषध या सर्वांपेक्षा प्रभावी असल्याचे चाचण्यांतून समोर आले आहे.

चाचण्यांमध्ये एक आणि वापरात आल्यावर एक

बर्‍याच वेळा चाचण्यांमध्ये एक आणि नंतर वापरात आल्यावर एक असा परिणाम दिसून आलेला आहे. तसेच विषाणू बदलला की औषधाची परिणामकारकताही बदलते. त्यामुळे व्यापक वापरानंतरच त्याचे परिणाम दिसू शकतील.

– डॉ. अविनाश भोंडवे,राष्ट्रीय अधिष्ठाता, कॉलेज ऑफ जनरल प्रॅक्टिशनर, आयएमए

असा आहे या औषधाचा डोस व वैशिष्ट्ये

  • आठशे एमजीची गोळी दिवसातून दोन वेळा, पाच दिवस
  • कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यावर पहिल्या तीन ते पाच दिवसांत दिल्यास अधिक प्रभावी
  • एचआयव्हीमध्ये औषधांचा प्रभाव वाढवणारे औषध रिटोनाविर हे औषध मॉल्नुपिराविरसोबत दिले जात असल्याने त्याची क्षमता अधिक वाढते.

हेही वाचा: 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news