Live : कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक : मतपेटीत सापडली ५० रुपयांची नोट | पुढारी

Live : कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक : मतपेटीत सापडली ५० रुपयांची नोट

कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज शुक्रवार सकाळी (दि.०७) ८ वाजल्यापासून सुरूवात झाली. रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉल येथे मतमोजणी होत आहे. दरम्यान, जिल्हा बँकेचा पहिल्या टप्प्यातील कौल सकाळी दहा वाजता समजणार आहे. बँकेच्या निवडणूक निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

महिनाभर जिल्ह्याचे राजकारण ढवळून काढणार्‍या जिल्हा बँक संचालकांच्या २१ जागांपैकी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आ. पी. एन. पाटील, आ. राजेश पाटील, माजी आ. अमल महाडिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांची निवड बिनविरोध झाली. संस्था गटातील सहा जागांसह १५ जागांसाठी ३३ उमेदवारांचे भवितव्य बुधवारी झालेल्या मतदानानंतर मतपेटीत बंद झाले.

जिल्ह्यातील १३ ठिकाणी ४० केंद्रांवर ७ हजार ६५१ पैकी तब्बल ७ हजार ४९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. शाहूवाडी, गडहिंग्लज आणि भुदरगड तालुका संस्था गटात १०० टक्के मतदान झाले. प्रक्रिया गटात ४४८ पैकी ४४६, पतसंस्था गटात १२२१ पैकी १२०७, इतर संस्था गटात ४११५ पैकी ३९९५ असे सरासरी ९८ टक्के चुरशीने मतदान झाले. वाढलेला मताचा टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार, याची उत्कंठा सर्वच घटकांना लागून राहिली आहे.

लाईव्ह अपडेट्स…

  • कोल्हापूर जिल्हा बॅंक निवडणुकीत शिरोळमधून मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर विजयी झाले आहेत. ‘दत्त’चे चेअरमन गणपतराव पाटील यांना ५१ मते, तर यड्रावकर यांनी ९८ मते मिळाली आहे.

खासदार संजय मंडलिक www.pudhari.news

  • कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणूकांची मागच्या दीड महिन्यापासून रंगत् सुरू आहे. आज मतमोजणीला  शुक्रवारी (दि.७) सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
  • सकाळी नऊ वाजता खासदार संजय मंडलिक यांनी रमणमळा येथील मतमोजणी केंद्राला भेट दिली. यावेळी ते म्हणाले की, मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदार जिल्हा बँकेत कोणाला निवडून द्यायचे त्यांनी ठरवलं होतं. जिल्हा बँक वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मतदारांनी दिलेला कौल आम्हाला मान्य आहे.
  • कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणूक मतमोजणीला आज शुक्रवारी (दि.७) सुरुवात झाली. मतपेट्या उघडताच त्यात मतदारांनी लिहिलेल्या चिठ्ठ्या सापडल्या. या चिठ्ठ्यांमध्ये काही मतदारांनी नेते, उमेदवारांना उद्देशून सूचना केल्या आहेत. ‘आम्हाला वाटायचं साहेबांचे कार्यकर्ते भाजप वाढवत आहेत. पण साहेब सुद्धा…आता काय?. सर्व उमेदवार राजकारणी असून आज एकमेकांवर पकड करत आहेत. पण निवडणूक झाल्यानंतर पुन्हा गळ्यात गळे घालणारे स्वार्थी लोक बँकेवर कायम राहणार. त्यासाठी प्रशासक असणे आवश्यक आहे,’ असे मतदारांनी लिहिले आहे.
  • ‘उद्यापासून समरजितदादा सर्वसामान्य लोकांची डोकी फोडण्यासाठी तालुका फिरायला मोकळे’, असे एका चिठ्ठीत लिहिण्यात आले आहे. तर चक्क एका मतदाराने मतपेटीत टाकलेले पन्नास रुपये मतमोजणीवेळी सापडले. हा विषय मतदान केंद्रावर खूप चर्चेचा ठरला आहे.

मतमोजणीला सुरुवात…

 

Back to top button