रत्नागिरी जिल्ह्यात इयत्ता पहिली ते नववी, अकरावीचे वर्ग बंद

रत्नागिरी जिल्ह्यात इयत्ता पहिली ते नववी, अकरावीचे वर्ग बंद

रत्नागिरी ; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाने पहिली ते नववी आणि अकरावीचे वर्ग बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दहावी व बारावीची परीक्षा जाहीर झाली असल्याने कोरोना नियमांचे पालन करून वर्ग सुरू ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिल्या आहेत.

ओमायक्रॉनच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यातही दक्षता घेतली जात आहे. नववर्षाच्या प्रारंभीच रत्नागिरी जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढू लागली आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसांत तब्बल तीनशेहून अधिक रुग्ण सापडले आहेत. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातही जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे.

1 ली ते 9 वी आणि 11 वीचे वर्ग ऑनलाईन घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. 10 वी व 12 वीची परीक्षा जाहीर झालेली असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, त्याचप्रमाणे त्यांचे अंतर्गत मूल्यमापन व प्रात्यक्षिक परीक्षा होणार असल्याने अध्यापन सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. शाळांमध्ये 15 ते 18 वयोगटासाठी लसीकरण शिबिर लावण्याच्या सूचना दिल्या आहेत.

…तर आठवडा बाजार बंद

जिल्ह्यात रुग्णसंख्या घटल्यानंतर बाजारपेठा सुरळीत झाल्या आहेत. मागील दीड महिन्यापासून आठवडा बाजारही सुरू झाले आहेत. परंतु; या बाजारात शेतकरी, व्यापारी व ग्राहकांकडून कोरोना निर्बंधांची पायमल्‍ली होताना दिसत आहे. त्यामुळे व्यापार्‍यांना मास्क, सॅनिटायझर व कोरोना निर्बंध पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पुढील आठवडाभर या बाजारांचे निरीक्षण केले जाणार असून, निर्बंधांचे योग्य पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास आठवडा बाजार बंद केले जातील, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news