पिंपरी : 18 दिवसांत आढळले 176 संशयित; 6 जणांना बाधा

पिंपरी : 18 दिवसांत आढळले 176 संशयित; 6 जणांना बाधा
Published on
Updated on

दीपेश सुराणा

पिंपरी : शहरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. 18 दिवसांमध्ये 176 संशयित रुग्ण आढळले आहेत. तर, 6 जणांना डेंग्यूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गतवर्षी जून महिन्यात केवळ 39 संशयित रुग्ण होते. तर, एकालाही डेंग्यूची बाधा झाली नव्हती. त्या तुलनेत यंदा डेंग्यू रुग्णांची संख्या वाढल्याने त्याबाबत अधिक दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

गतवर्षी जून महिन्यात केवळ 39 संशयित रुग्ण आढळले होते. एकही बाधित रुग्ण आढळला नव्हता. तथापि, जुलै महिन्यापासून बाधित रुग्णांची नोंद होण्यास सुरुवात झाली. यंदा जून महिन्यात 1 ते 18 तारखेदरम्यानच 176 संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 6 बाधित रुग्ण आढळले आहेत. डेंग्यू रुग्णांच्या संख्येचा आलेख हा सध्या वाढता राहिला आहे. मे महिन्यात 119 संशयित रुग्ण तर, 1 बाधित रुग्ण आढळला होता. त्या तुलनेत जून महिन्यात रुग्ण संख्येत वाढ झाली आहे.

संशयित रुग्णांमध्ये पाच पट वाढ
डेंग्यूच्या संशयित रुग्णांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत पाच पट वाढ झाली आहे. गतवर्षी जानेवारी ते जून अशा सहा महिन्यांमध्ये केवळ 115 संशयित रुग्ण आढळले होते. तर, एकाही बाधित रुग्णाची नोंद झाली नव्हती. यंदा 1 जानेवारी ते 18 जून अशा साडेपाच महिन्यांच्या कालावधीतच 646 संशयित रुग्ण आढळले आहेत. तर, 9 बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

खासगी रुग्णालयांतील नोंदीबाबत साशंकता
महापालिका प्रशासनाकडे महापालिका व खासगी रुग्णालयांतील डेंग्यू रुग्णाची एकत्रित नोंद केली जाते. खासगी रुग्णालयांना डेंग्यू रुग्णांची माहिती भरता यावी, यासाठी सारथी अ‍ॅपलाच त्याबाबतची लिंक देण्यात आलेली आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांची माहिती अद्ययावत राहत असल्याचा महापालिका वैद्यकीय विभागाचा दावा आहे. तसेच, डेंग्यू रुग्णांच्या चाचण्या करण्यासाठी आवश्यक नमुने महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयाकडे खासगी रुग्णालयांतून पाठविले जातात. दरम्यान, खासगी रुग्णालये ही माहिती नियमितपणे किती भरतात, याविषयी मात्र साशंकता आहे. ते तपासणार्‍या यंत्रणेचा अभाव आहे.

डेंग्यूची लक्षणे
अचानक ताप येणे, तीव्र डोकेदुखी, मळमळ आणि उलट्या होणे, सांधेदुखी, स्नायूंतील वेदना आणि डोळ्यांच्या मागे वेदना, अशक्तपणा येणे, घशात दुखणे आदी.

उपाययोजना
डेंग्यू हा आजार पसरविण्यास एडिस इजिप्ताय हे डास कारणीभूत ठरतात. त्यामुळे डासांची उत्पत्ती रोखणे सर्वाधिक गरजेचे आहे. घरातील पाणी साठविण्याची सर्व भांडी कोरडी करून पुन्हा त्यामध्ये पाणी भरावे. घरातील फ्लॉवरपॉट, कुलर व फ्रिजच्या खालच्या ट्रेमधील पाणी दर आठवड्यास रिकामे करावे. घराच्या मागच्या अंगणात किंवा गच्चीवर असलेल्या भंगार मालाची विल्हेवाट लावावी. घराभोवती असलेली पाण्याची डबकी बुजवावी. तसेच, येथे पाणी वाहते राहील, याची दक्षता घ्यावी.

डेंग्यू रुग्णांचा चढता आलेख (2022)
महिना     संशयित रुग्ण     बाधित रुग्ण
जानेवारी       150                   2
फेब्रुवारी        58                    –
मार्च             57                     –
एप्रिल           86                     –
मे               119                     1
जून            176                     6
एकूण         646                     9

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news