कोल्हापूर : पगारासाठी गुरुजींचे आंदोलन | पुढारी

कोल्हापूर : पगारासाठी गुरुजींचे आंदोलन

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : एप्रिल व मे महिन्याचा थकीत पगार देण्याच्या मागणीसाठी राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने सोमवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी महिन्याच्या 1 तारखेला शिक्षकांचा पगार मिळालाच पाहिजे; अन्यथा उपोषण करण्यात येईल, असा इशारा शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांनी दिला. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा शिक्षकांचा पगार अद्याप होऊ शकला नाही. याकडे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक संघातर्फे धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता.

शिक्षक सकाळपासूनच आंदोलनासाठी जिल्हा परिषदेसमोर जमत होते. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी प्रशासनाच्या वेळकाढूपणाबद्दल अनेक शिक्षकांनी संतप्‍त भावना व्यक्‍त केल्या. राजाराम वरुटे यांच्यासह जिल्हाध्यक्ष संभाजी बापट, शिक्षक बँकेचे अध्यक्ष बाजीराव कांबळे, उत्तम सुतार, वसंत जाधव, बजरंग लगारे, मारुती दिंडे, सुमन पवार आदींची भाषणे झाली.

प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले. त्यांनी दोन दिवसांत पगार करण्याचे आश्‍वासन दिले. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, वित्त लेखाधिकारी विलास पाटील यांनाही निवेदन देऊन चर्चा केली. यावेळी एम. एम. गुरव, अनिल चव्हाण, बाबा साळोखे, मायकल फर्नांडिस, राजेंद्र मांडेकर, प्रशांत पोतदार आदी उपस्थित होते.

Back to top button