कोल्हापूर : ‘थेट’ पाण्याने अभ्यंगस्नान यंदाही अशक्य! | पुढारी

कोल्हापूर : ‘थेट’ पाण्याने अभ्यंगस्नान यंदाही अशक्य!

कोल्हापूर ; सतीश सरीकर : कोल्हापूर शहराला स्वच्छ व मुबलक पाणी मिळण्यासाठी तब्बल 500 कोटींची काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना आखण्यात आली. केंद्र व राज्य शासनाकडून त्यासाठी निधी मिळाला. एरवी निधी नाही म्हणून महापालिका अधिकारी अक्षरशः घसा दुखेपर्यंत ओरडत असतात; पण योजनेसाठी निधी येऊन पडला आहे. तरीही गेली आठ वर्षे योजनेचे काम रडतखडतच सुरू आहे.

ठेकेदार कंपनीवर कुणाचाच वचक नसल्याचे चित्र आहे. पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी येत्या दिवाळीला अभ्यंगस्नान थेट पाईपलाईनच्या पाण्यानेच, अशी घोषणा केली आहे. दस्तुरखुद्द आयुक्‍त डॉ. कादंबरी बलकवडे यांनीही मे अखेरपर्यंत योजना पूर्ण होईल, अशी ग्वाही दिली होती; परंतु योजनेची सद्यःस्थिती यावर्षीही योजना पूर्ण होऊ शकणार नाही हे वास्तव आहे. थेट पाईपलाईनच्या पाण्याने अभ्यंगस्नान यंदाही अशक्य आहे. ज्या धरणातून पाणी उपसा करून ते कोल्हापूरपर्यंत आणायचे आहे, तीच बहुतांश कामे अपूर्ण आहेत.

कोल्हापूरवासीसयांसाठी थेट पाईपलाईनची मागणी गेल्या 40-50 वर्षांपासून केली जात असल्याने ही योजना अत्यंत जिव्हाळ्याची आहे. पालकमंत्री पाटील यांनी गेल्या दोन वर्षांत योजना पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. आयुक्‍त डॉ. बलकवडे यांच्यासह अधिकारी, ठेकेदार कंपनी, कन्सल्टंट यांच्यासोबत बैठका घेऊन सूचना केल्या. काहीवेळा प्रत्यक्ष काळम्मावाडी धरण क्षेत्रातही जाऊन पाहणी केली. वास्तविक प्रशासनाने काळजीपूर्वक काम करून योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे आ?वश्यक आहे. परंतु अधिकार्‍यांना थेट पाईपलाईन योजनेचेच गांभीर्य नसल्याचे यावरून दिसून येते. योजनेचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे.

महापालिकेला त्याचे काहीही सोयरसुतक नसल्याचे चित्र आहे. वास्तविक 500 कोटींची योजना आणि ऊन-वारा-पाऊस याची शक्यता गृहीत धरून एकाचवेळी दोन-तीन टप्प्यांवर वेगवेगळी कामे होणे आवश्यक आहेत; परंतु ठेकेदार कंपनीकडून अत्यंत कमी कर्मचार्‍यांमार्फत कामे करून घेतली जात आहेत. त्याचा फटका योजनेच्या दिरंगाईला बसत आहे.

योजनेसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली बहुतांश कामे काळम्मावाडी धरण क्षेत्रात आहे. धरणात इन्स्पेक्शन वेल बांधण्यात येणार आहेत. इन्स्पेक्शन वेल क्र. 1 व 2 या दोन्हींचे काम अपूर्ण आहे. या इन्स्पेक्शनवेलला कनेक्टिंग पाईप टाकून ते जॅकवेल क्र. 1 व 2 मध्ये आणले जाणार आहे. सुमारे दीडशे फूट उंचीची ही जॅकवेल आहेत. त्यांची कामेही अपूर्ण आहेत. या जॅकवेलवर स्लॅब टाकून पंप बसविण्यात येणार आहेत; परंतु दोन्ही जॅकवेलचे स्लॅब अनुक्रमे 21 मीटर व 27 मीटर उंचीपर्यंतच आले आहेत.

थेट पाईपलाईन योजनेसाठी बिद्रीहून राजापूरच्या जॅकवेलपर्यंत सुमारे 30 किलोमीटर लांब विद्युत वाहिन्या टाकण्यात येणार आहेत. 33 या केव्हीच्या लाईन असून, ते कामही पूर्ण झालेले नाही. तसेच विद्युत कनेक्शनसाठी सबस्टेशनचे कामही अपूर्ण आहे. योजनेसाठी आवश्यक असलेले एअर व्हॉल्व्ह 72 पैकी 40 बसविणे बाकी आहेत. स्कोर व्हॉल्व्ह आठपैकी एकही बसविलेला नाही. 11 पैकी 5 बटरफ्लाय व्हॉल्व्ह बसविले असून, 6 व्हॉल्व्हची कामे प्रलंबित आहेत.

…तरच योजना वेळेत पूर्ण होईल

दरवर्षी पावसाळ्यात धरण पूर्ण भरते आणि ठेकेदार कंपनी हात वर करते. धरणात पाणी असल्याने काम होऊ शकत नसल्याचे सांगितले जाते. गेली सात वर्षे हे असेच सुरू आहे. पावसावर योजनेचे भवितव्य अवलंबून आहे. पाऊस लांबला आणि ठेकेदाराने वेळेत कामे पूर्ण करण्याचा निर्धार केला तरच कोल्हापुरात यंदा पाणी पोहोचू शकेल; पण आजपर्यंतचा इतिहास आहे की, धरण क्षेत्रात प्रचंड पाऊस असतो. त्यामुळे थेट पाईपलाईनच्या पाण्याच्या अभ्यंगस्नानासाठी अजून किती दिवाळींची वाट बघायची? असा प्रश्‍न शहरवासीयांना पडला आहे.

अत्यंत महत्त्वाची अपूर्ण कामे…

  • धरण क्षेत्रात इंटकवेल
  • धरणातील इन्स्पेक्शन वेल क्र. 1 व 2
  • धरण क्षेत्रातील जॅकवेल क्र.1 व 2
  • दोन्ही जॅकवेलवर पंप हाऊस
  • बिद्री ते राजारापूर विद्युत वाहिन्या
  • राजारापुरात सबस्टेशन
  • पाच लाख लिटर क्षमतेचा ब्रेक प्रेशर टँक

Back to top button