सांगली : खूनप्रकरणी दाम्पत्यास जन्मठेप | पुढारी

सांगली : खूनप्रकरणी दाम्पत्यास जन्मठेप

सांगली; पुढारी वृत्तसेवा : अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून खून केल्याबद्दल संजय उद्धव जाधवर व त्याची पत्नी उमा संजय जाधवर (दोघे रा. काशीदवाडी, ता. केज, जि. बीड) यांना जन्मठेप व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश अजेय श्रीधर राजंदेकर यांनी सुनावली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील मकरंद ग्रामोपाध्ये व प्रमुख जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख यांनी काम पाहिले.

खटल्याची पार्श्वभूमी अशी- संजय व उमा जाधवर तसेच मयत सखाराम कदम हे तिघेजण बीड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. साखर कारखान्याच्या ऊस तोडणी करता मजूर म्हणून ते कोल्हापूर जिल्ह्यात आले होते. यापैकी सखाराम कदम हा ट्रॅक्टर ड्रायव्हर म्हणून काम करत होता. सखरामचे उमाबरोबर अनैतिक संबंध असल्याचा संशय संजय जाधवर यांना होता.

दि. 9 मार्च 2013 रोजी संजय जाधवर याने रोहित माळी यांच्या मदतीने सखाराम कदमला शरद साखर कारखान्यासमोर बोलावून घेतले. त्यावेळी संजय जाधवर याने सखाराम यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला व सखारामचे मुंडके व धड वेगवेगळे करून तो मृतदेह नदीपात्रात टाकला.

त्यानंतर सखारामच्या ट्रॅक्टर मालकाने सखाराम हरविला असल्याची तक्रार पोलिसात दिली. काही दिवसांनी ते मुंडके नसलेले अनोळखी प्रेत सांगली जिल्ह्यातील समडोळी नदीपात्रात तरंगत असल्याचे काही लोकांच्या निदर्शनास आले.त्यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यास याबाबत कळविले. त्या मृतदेहाच्या अंगावर केवळ अंडरवेअर होती. पोलिस उपनिरीक्षक सागर पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपासाला सुरुवात केली व काही तासात पोलिसांनी आरोपींना अटक केली.

याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला. उपविभागीय अधिकारी बनसोडे यांनी या प्रकरणी तपास करून आरोपपत्र दाखल केले. त्यांना पोलिस उपनिरीक्षक सागर पाटील यांनी मदत केली. सरकार पक्षातर्फे एकूण 21 साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आश्विनी राख, डॉक्टर व अन्य साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने खून व गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल भादवि कलम 302 व 201 अन्वये दोषी ठरवून संजय जाधवर व उमा जाधवर यांना शिक्षा सुनावली

Back to top button