भवानीनगर : पुढारी वृत्तसेवा
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील गटांची तोडफोड करून जवळचे उमेदवार डोळ्यासमोर ठेवून गटांची रचना केलेली आहे. सणसर- बेलवाडी जिल्हा परिषद गटातील प्रभागरचना भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकार्यांना मान्य नसल्यामुळे लवकरच हरकती दाखल करण्यात येणार आहेत, असे पक्षाचे इंदापूर तालुकाध्यक्ष अॅड. शरद जामदार यांनी सांगितले.
सणसर येथील भाजप कार्यालयामध्ये सणसर-बेलवाडी गटातील प्रमुख पदाधिकार्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी भाजपचे जिल्हा सचिव तानाजीराव थोरात, पंचायत समितीचे माजी सभापती तुकाराम काळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संग्राम निंबाळकर, अर्बन बँकेचे संचालक लालासाहेब सपकळ, तालुका सचिव संतोष चव्हाण, दीपक निंबाळकर, किसान मोर्चाचे चिटणीस प्रताप रायते, नानासाहेब निंबाळकर, बी. के. सपकळ, दत्तात्रय गुप्ते आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
जामदार म्हणाले, सणसर-बेलवाडी नवीन जिल्हा परिषद गट चुकीच्या पद्धतीने केलेला आहे. पंचायत समिती गणाला काझड, शिंदेवाडी ही गावे जोडण्यात आली असून ती गावे सणसरपासून दहा ते पंधरा किलोमीटरच्या अंतरावर आहेत. राज्यमंर्त्यांनी हस्तक्षेप करून गट-गणांच्या रचना त्यांच्या मनासारख्या केल्या आहेत. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी वीस वर्षात अशा प्रकारचे राजकारण केलेले नाही.
निकषांना डावलून गट-गण जाहीर केल्यामुळे आठ जूनपर्यंत हरकती घेण्यात येणार आहेत. पवारवाडी, घोलपवाडी, तावशी, उदमाईवाडी ही गावे पूर्वीप्रमाणे गट व गण ठेवावीत. रचना करताना राष्ट्रीय महामार्ग सीमेचे उल्लंघन झालेले आहे. दक्षिणेकडील गावे जोडण्याची आवश्यकता असताना काझड, शिंदेवाडी ही गावे जोडल्यामुळे अंतर वाढत आहे.
हेही वाचा