आळेफाटा : पुढारी वृत्तसेवा
जुन्नर तालुक्यातील नामांकित शैक्षणिक संस्था ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ, आळे संतवाडी कोळवाडीच्या 1988 पासून ताब्यात असलेली सरकारी जमीन महसूल विभागाने नियमित केल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब कुर्हाडे यांनी दिली. या निर्णयामुळे संस्थेच्या गायरान जागेचा प्रश्न मार्गी लागला आहे.
भाऊसाहेब कुर्हाडे यांनी 2019 पासून शासनदरबारी पाठपुरावा करून महसूल विभागाकडून रीतसर 125 आर क्षेत्र संस्थेस प्राप्त करून दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार अतुल बेनके तसेच माजी व विद्यमान संचालक मंडळ, सभासद, ग्रामस्थ, आळे, संतवाडी, कोळवाडी गावचे माजी व विद्यमान सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य, विविध शासकीय अधिकारी, माजी विद्यार्थी संघ मुंबई व पुणे यांचे सहकार्य लाभले.
जमिनीचा प्रश्न मार्गी लागल्याने संस्थेस नवनवीन व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्याचा तसेच नवीन इमारत उभारणीचा मार्ग मोकळा झाल्याचेही भाऊसाहेब कुर्हाडे यांनी सांगितले. या निर्णयाबद्दल आळे, संतवाडी, कोळवाडी ग्रामस्थ व सभासद यांनी संस्थेचे अध्यक्ष भाऊदादा कुर्हाडे व संचालक मंडळाचे कौतुक केले आहे.
संस्थेची इतरही प्रशासकीय प्रलंबित कामे लवकरच मार्गी लागणार आहेत. संस्थेचे सभासद संस्थेच्या हितासाठी जो निर्णय आम्ही घेतो, त्याला नेहमीच एकमताने पाठिंबा देतात. संस्थेचे सभासदच संस्थेचा गाभा आहे.
– भाऊसाहेब कुर्हाडे, अध्यक्ष, ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ
हेही वाचा