सोमेश्वरनगर : पुढारी वृत्तसेवा
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने सन 2021-22 या गळीत हंगामातील खोडकी बिलास 150 रुपये प्रतिटन आणि दुसरे बिल 200 रुपये प्रतिटन असे 350 रुपये 30 जूनपर्यंत सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग करावेत, अशी मागणी शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी केली आहे.
याबाबत काकडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, सोमेश्वरने नुकत्याच संपलेल्या हंगामात 13 लाख 25 हजार टन उच्चांकी गाळप करून 15 लाख 54 हजार साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. कारखान्याचा साखरेचा उतारा 11.73 जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आहे. तसेच वीजनिर्मिती, अल्कोहोल, इथेनॉल यांचे उत्पादनही चांगले झाले असून त्याचे रोख पैसे कारखान्यास मिळालेले आहेत.
त्यामुळे संचालक मंडळाला सभासदांना 350 रुपये देण्यास काहीच अडचण नाही. चालू हंगामात अध्यक्ष व कार्यकारी संचालक यांच्या चुकीच्या नियोजनामुळे गाळपास उशीर झाल्याने काही सभासदांचा ऊस 19 ते 21 महिने शेतातच उभा असल्याने तो पेटवून गाळपास द्यावा लागला.
त्यामुळे कारण नसताना त्यांच्या बिलातून 800 रुपये अन्यायकारक कपात करण्यात आली आहे. ते परत देण्याचा ठराव करावा अशी मागणीही काकडे यांनी केली. सभासदांच्या तोडी लांबल्याने ऊस वजनामध्ये 10 ते 15 टनांची घट झाली, त्यातही सभासदांचेच नुकसान झाले असल्याचे काकडे म्हणाले.
अध्यक्षांनी यापुढे फक्त आणि फक्त कारखाना कसा चांगला चालेल व सभासदांना जास्तीत जास्त न्याय कसा देता येईल एवढेच पाहावे. स्वतःचे गाव सोडुन इतर कोणत्याही गावात नाक खुपसू नये. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याला फक्त कारखाना पाहावयास सांगितले आहे. इतर गावात लक्ष घालण्यास नाही.
– सतीश काकडे
हेही वाचा