बारामती : पुढारी वृत्तसेवा
बाजारात जे विकेल तेच पिकवून अधिकचा नफा मिळवता येतो, हे कोर्हाळे बुद्रुक येथील अजित पोमणे या युवा शेतकर्याने दाखवून दिले आहे. पोमणे हे कलिंगडाची विक्री बांधावर करीत असून, प्रतिवर्षी त्यांना कलिंगडापासून तीन ते साडेतीन लाख रुपये उत्पन्न मिळते. यंदा कलिंगडामधून त्यांना खर्च वजा जाऊन 3 लाख 20 हजार रुपये मिळाले. मागील वर्षी भाज्यांच्या रोपांतून 6 लाख रुपये, तर 4 लाख 50 हजार ऊसरोपे विक्री करून 11 लाख 25 हजार रुपये मिळाले.
त्यातून खर्च वजा जाऊन त्यांना 4 लाख 50 हजार रुपयांचा नफा झाला. बाजारात मागणी असलेला शेतमाल आपल्या शेतात पिकवावा, या संकल्पनेतून कोर्हाळ्यातील पोमणे यांनी श्री सिद्धिविनायक हायटेक रोपवाटिका आणि शेडनेट हाऊसची उभारणी केली. त्यातून ते परिसरातील शेतकर्यांना चांगल्या दर्जाची रोपे, फळे उपलब्ध करून देतात. या माध्यमातून त्यांनी उत्पन्न वाढविले. सोबत उन्हाळ्यात कलिंगड शेतीच्या माध्यमातूनही साडेतीन लाखांचे उत्पन्न मिळविले.
पोमणे यांनी 2012 मध्ये धान्य पिकातून मिळणारे अल्पोत्पन्न लक्षात घेता त्यांनी नगदी पिकांकडे वळण्याचा निर्णय घेतला. शेतात ऊस, कलिंगड, कांदा, वांगी, टोमॅटो ही पिके लावली. त्यानंतर 2014 मध्ये 3 हजार पक्ष्यांचे 2 पोल्ट्री शेड उभे केले. दरवर्षी साधारणपणे ऊस 10 एकर, कलिंगड 1 एकर, वांगी 1 एकर, बटाटा 1 एकर व आले 1 एकर अशी नगदी पिके ते घेऊ लागले. भाजीपाला लागवडीसाठी रोपखरेदीवर मोठ्या प्रमाणावर खर्च होऊ लागल्याने त्यांनी स्वतःची रोपवाटिका उभारण्याचा निर्णय घेतला.
मागील वर्षी अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेअंतर्गत रोपवाटिका स्थापन केली. या वर्षी कृषी विभागाकडून आणखी एक शेडनेट गृह मंजूर झाले. यामुळे आणखी एका रोपवाटिकेची निर्मिती केली. रोपवाटिकेसाठी जवळपास 15 ते 16 लाख रुपये खर्च आला. शासनाच्या कृषी विभागाकडून यासाठी 7 लाख 10 हजार रुपये अनुदान प्राप्त झाले.
कृषी विभागाकडून रोपवाटिकेला आणि शेडनेटसाठी अनुदान प्राप्त झाले. त्यामुळे हायटेक रोपवाटिकेची निर्मिती करू शकलो. शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, याचे मार्गदर्शन कृषी विभागाकडून मिळू लागल्याने चांगल्या दर्जाची रोपे तयार करू शकलो, असे पोमणे यांनी सांगितले.
कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ अजित पोमणे यांना देण्यात आला. पोमणे हे त्यांच्या रोपवाटिकेत चांगल्या दर्जाच्या रोपांची उत्पादने घेत असल्याने परिसरातील शेतकर्यांना स्थानिक पातळीवर रोपे उपलब्ध होत आहेत.
– वैभव तांबे, उपविभागीय कृषी अधिकारी, बारामती