

पुणे : तबल्याचा नियमितपणे सराव, दररोज साधारण सहा तास अभ्यास करणारा आणि काही तास खेळण्यासाठी देणारा, शाळेच्या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आवर्जून सहभागी होणारा आयुष इनामदार या विद्यार्थ्याने दहावीच्या परीक्षेत शतप्रतिशत गुण मिळवण्याची कामगिरी केली आहे. या कामगिरीमुळे पुणे शहरात पहिला येण्याचा मान त्याने मिळवला आहे.
आयुषची तबला वाजवण्याची आवड त्याच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावणारी ठरली असून, 490 गुण मिळवणार्या आयुषला तबला वादनासाठीचे अतिरीक्त 10 गुण मिळाल्याने तो 500 गुण मिळवत यशस्वी झाला. आयुष महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मयूर कॉलनी येथील बालशिक्षण मंदिर या शाळेचा विद्यार्थी आहे. वर्षभर केवळ अभ्यासाच्या मागे न लागता आयुषने संगीत, खेळ, कुटुंबासोबतची मुशाफिरी अशा सर्वच गोष्टींना समान प्रमाणात महत्त्व दिले.
दररोज काही तास अभ्यास करीत असल्याने परीक्षेच्या वेळी दडपण आले नाही. याच काळात त्याने तबल्याच्या साधारण तीन परीक्षा दिल्या आहेत. आयुषला विज्ञान शाखेत रुची असून, वडिलांप्रमाणेच त्याला अभियंता व्हायचे आहे. या पुढेही तबला वादन आणि खेळांमध्ये सहभागी होऊन आपली शैक्षणिक प्रगती अशीच सुरू ठेवणार असल्याचे आयुषने सांगितले.
अभ्यासाचा आत्मविश्वास असल्याने चांगल्या गुणांची अपेक्षा होती. शाळेने वर्षभर अभ्यासाची काळजी घेतली. याचबरोबर आम्ही वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही सहभागी व्हायचो. काही सिनीअर्स मित्रांनी मदत केल्यामुळे चांगले यश मिळवता आले.
– आयुष इनामदार, विद्यार्थी
हेही वाचा