

कडूस : पुढारी वृत्तसेवा
कडूस (ता. खेड) येथील (११ वर्षीय) गिर्यारोहक वरदराजे रवींद्र निंबाळकर याने अतिकठीण असा वजीर सुळका लीलया सर केला. त्याच्या या धाडसाचे संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक केले जात आहे.
बुद्धिबळातील वजिरासारखा दिसणारा वजीर सुळका हा नेहमीच पर्यटकांना खुणावत असतो. या सुळक्याची उंची साधारण २०० फुटांच्या आसपास असून, हा समुद्र सपाटीपासून साधारणपणे २ हजार ८०० फूट उंचीवर आहे. त्याचे भौगोलिक स्थान हे ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील माहुली किल्ल्यालगत आहे.
आठ सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गिरीभ्रमर ग्रुप, राजगुरुनगर व शिवदुर्गप्रेमी प्रतिष्ठान, शिरूर या पुणे जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांनी रविवारी (दि. ९) यशस्वीपणे चढाई केली. या मोहिमेला पहाटे तीन वाजता पायथ्याशी असलेल्या वांद्रे गावातील महादेव मंदिरातून सुरुवात केली. विशेष उल्लेखनीय म्हणजे या मोहिमेत अकरा वर्षीय वरदराजे निंबाळकर, सहा वर्षीय हर्षिता भोईर (नवी मुंबई), नऊ वर्षीय सौम्या जोशी (पुणे) या बाल गिर्यारोहकांनी यशस्वी व धाडसी चढाई केली.
या मोहिमेत राजाराम मराठे (वय ६७) या गिर्यारोहकाने लीलया चढाई पार पाडली. खेड तालुक्यातून हनुमंत जगताप, दत्तात्रय बोडरे, रवींद्रराजे निंबाळकर, सतीश जाधव, अमोल सांडभोर तर शिरूर तालुक्यातील विठ्ठल देशमुख, उमेश धुमाळ, संतोष पवार, सचिन पवार या शिक्षकांनी सहभाग घेतला. तसेच मावळ तालुक्यातून मनोहर भालके सहभागी झाले होते.
वजीर सुळक्याच्या माथ्यावर तिरंगा फडकवल्यानंतर विठ्ठल देशमुख यांनी या मोहिमेबद्दल आनंद व्यक्त केला. दिवंगत समाजसेविका अनाथांची माय सिंधूताई सपकाळ व कोरोनाच्या दोन्ही लाटेत ज्या शिक्षक बंधू-भगिनी यांनी कोरोना वॉरियर्स म्हणून काम करताना आपला जीव गमावला त्यांना आम्ही या मोहिमेद्वारे श्रद्धांजली अर्पण केल्याचे त्यांनी सांगितले.