

भिगवण: उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पुढाकाराने सलग तिसऱ्या वर्षी उजनी धरणात दोन कोटी रुपयांचे मत्स्यबीज सोडण्यात येणार आहे. राज्य शासनामार्फत मत्स्यबीज सोडण्यात येणारे उजनी हे राज्यातील पहिले धरण ठरले आहे. यामुळे हजारो मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटण्याबरोबरच धोक्यात आलेली मत्स्यसंपदा देखील पूर्वपदावर येऊ लागली आहे.
प्रदूषण, बेसुमार व अवैध मासेमारीमुळे उजनी धरणातील मत्स्यसंपदा धोक्यात आली होती. उत्पादन घटून हजारो मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. मत्स्यबीज सोडण्याच्या निर्णयामुळे धोक्यात आलेली उजनीतील मासेमारी पूर्वपदावर येऊ लागली आहे. यामुळे उजनीतील चवदार मासे पुन्हा एकदा देश विदेशातील खवय्यांना चाखायला मिळणार आहेत.
राज्यातील गोड्या पाण्यातील माशांचे सर्वात मोठे कोठार म्हणून उजनीकडे पाहिले जाते. देशी व प्रमुख कार्प जातीच्या चवदार माशांमुळे उजनीचे मासे राज्यात, देशातच नव्हे तर सातासमुद्रापार ओळखले जातात. मात्र, गेली पंधरा वर्षात वाढते प्रदूषण व लहान आकारांच्या वडाप व पंड्याच्या साहाय्याने बेसुमार अवैध मासेमारी झाल्याने जैविक साखळी तुटली होती. देशी माशांच्या चाळीसहून अधिक जाती दुर्मिळ झाल्या होत्या. तसेच प्रमुख कार्प जातीचे रोहू, कटला, मृगल जातीचे मासेही संपुष्टात आले होते. साहजिकच उत्पादन घटून हजारो मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता.
मच्छीमारांचे प्रतिनिधी भरत मल्लाव, उज्ज्वला परदेशी, अनिल नगरे, संजय दरदरे, चंद्रकांत भोई, प्रवीण नगरे, विकास पतुरे, नवनाथ परदेशी, पोपट नगरे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ही बाब कृषिमंत्री भरणे यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर भरणे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना ही बाब सांगितली. त्यांच्या पुढाकारातून जिल्हा नियोजन मंडळाच्या नावीन्यपूर्ण योजनेतून उजनीत 2021-22 पासून मत्स्यबीज सोडण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. तसेच लहान जाळ्यांचा साहाय्याने होणाऱ्या मासेमारीवर बंदी घालण्यात आली. परिणामी उजनीत देशी मासे तसेच प्रमुख कार्प जातीचे मासे मोठ्या प्रमाणात सापडू लागले आहेत
यावर्षीही उजनीत दोन कोटी रुपयांचे बीज सोडण्यात येणार आहे. याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सोलापूर जिल्ह्याच्या वतीने देखील नावीन्यपूर्ण योजनेतून मोठ्या प्रमाणात मत्स्यबीज सोडले जात आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी सोडलेले मत्स्यबीज आता तब्बल दहा-बारा किलोंपासून ते दोन अडीच किलो वजनाचे मिळत आहे. देशी माशांचे प्रमाण देखील वाढले आहे.
समाधानी झालो : कृषिमंत्री भरणे
याबाबत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, उजनीतील मासेमारीवर पुणे, सोलापूर, अहिल्यानगर या तीन जिल्ह्यांतील पारंपरिक तसेच धरणग््रास्त व मच्छीमारांचा मोठ्या प्रमाणात रोजगार अवलंबून आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पुढाकाराने उजनीत मत्स्यबीज सोडण्याचा धोरणात्मक निर्णय झाला. यातून गरिबांना रोजगार उपलब्ध करून दिल्याचा तसेच मत्स्य संपदा पूर्वपदावर येत असल्याचे समाधान आहे.