

Pune Sinhgad Khadakwasla Stray Dog Attacks Case
खडकवासला: खडकवासला-सिंहगड रोडसह पश्चिम हवेलीत मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट सुरू आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात दररोज सरासरी तीस जण गंभीर जखमी होत आहेत. यामध्ये लहान मुले, पादचाऱ्यांची संख्या अधिक आहेत, त्यामुळे सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सर्वात गंभीर स्थिती सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी, खडकवासला, जेपीनगर, नांदेड तसेच सिंहगड पायथ्याच्या खानापूर, डोणजे परिसरात आहे. या परिसरात शंभर-दीडशे मोकाट कुत्री आहेत. मुख्य सिंहगड रस्ता, पुणे-पानशेत रस्त्यावर हॉटेल, ढाबे, चिकन सेंटरचे शिळे मांस, कापलेल्या कोंबड्यांचे मांस जागोजागी फेकून दिले जात आहे. मांस, अन्न खाण्यासाठी रस्त्यावर तसेच ओढे नाल्यात कुत्र्यांच्या झुंडी गोळा होत आहेत. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या शालेय विद्यार्थी, पादचारी नागरिकांवर मोकाट कुत्री हल्ले करून चावा घेत आहेत.
सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाटा, जेपीनगर, कोल्हेवाडी, नांदेड फाटा आदी ठिकाणच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना ये-जा करणे धोक्याचे झाले आहे. खडकवासलामधील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शब्दा शिरपूरकर म्हणाल्या, कुत्र्याने चावा घेतलेले दररोज दहाहून अधिक रुग्ण उपचारासाठी येतात, कधी पंधरा-वीस जण असतात. आरोग्य विभागाने कुत्रा चावल्यानंतर रुग्णांना देण्यासाठी रेबीज लस उपलब्ध केली आहे. गंभीर जखमी रुग्णांना ससून रुग्णालयात पाठवले जात आहे.
याशिवाय धायरी फाट्यावरील पालिकेच्या मुरलीधर लायगुडे हॉस्पिटलमध्येही कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. खानापूर आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षाराणी मुंडासे म्हणाल्या, कुत्र्यांवरील लसीचा मुबलक साठा उपलब्ध आहे. त्यामुळे रुग्णांवर तातडीने उपचार केले जात आहेत. अलीकडच्या आठ-दहा दिवसांत कुत्र्यांनी चावा घेतलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे.
नांदेड खडकवासला भाजपचे अध्यक्ष रूपेश घुले म्हणाले, पालिकेत समावेश झाल्यापासून या भागात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. घरासमोर खेळणे तसेच शाळेत जाणे मुलांना धोकादायक झाले आहे. मोकाट कुत्र्यांच्या कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्यात अशी मागणी भाजप ओबीसी मोर्चाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दत्तात्रय कोल्हे यांनी केली आहे.