

सुरेश वाणी
नारायणगाव: जुन्नरसह आंबेगाव, खेड आणि शिरूर या चार तालुक्यांमध्ये बिबट्यांची संख्या बेसुमार वाढली आहे. येथे दररोज कोणत्या ना कोणत्या गावात पाळीव प्राणी अथवा मानवांवर बिबट्यांचे हल्ले होतात. या बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याच्या मागणीने काही महिन्यांपासून जोर धरला आहे. ही बिबट्याची समस्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातून या तालुक्यांच्या लोकप्रतिनिधींनी मार्गी लावावी, अशी येथील शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे अधिवेशनात संबंधित आमदार काय भूमिका मांडणार, याकडे चारही तालुक्यांचे लक्ष लागले आहे.
शिरूर येथील मानवांवरील हल्ल्यानंतर बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करू, असे राज्य सरकारने जाहीर केले होते. वनमंत्री गणेश नाईक हे जुन्नर व शिरूर तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनीही याबाबतचे सुतोवाच केले होते. एवढेच नाही तर दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांनीही सरकार बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणार, अशी ग्वाही दिलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही याबाबत बोलले आहेत. पिंजरे व इतर साहित्यखरेदीसाठी निधीची तरतूद करू, असाही शब्द दिलेला आहे.
दरम्यान, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनीही बिबट्यांचा येत्या काही महिन्यांत कायमस्वरूपी बंदोबस्त होईल; अन्यथा मी आमदारकीचा राजीनामा देईन, असा स्पष्ट इशारा दिला होता. ते म्हणाले होते, की जनतेपेक्षा मला आमदारकी मोठी नाही. परंतु, बिबट्याची समस्या जुन्नरच्या जनतेच्या पाचवीलाच पुजली आहे.
विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीही त्यांनी जुन्नर तालुका बिबटमुक्त करण्याचा जनतेला शब्द दिला होता. एक तर बिबट्या राहील, नाहीतर मी राहील, असे ते म्हणाले होते. त्यावेळी लोकांनी त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून त्यांना मतदान केल्याचे नागरिक सांगतात. आता सोनवणे आमदार झालेले दीड वर्षाचा कालावधी झाला आहे.
मात्र, जुन्नर तालुका अद्याप बिबटमुक्त झालेला नाही. याउलट बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेलीच आहे. सध्या हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून, या बिबट्यांचा प्रश्न आमदार शरद सोनवणे यांनी कायमस्वरूपी सोडवावा. सभागृहाच्या बाहेर आंदोलन करावे किंवा उपोषणाला बसावे, अशी मागणी जुन्नरच्या शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे. तसेच खेड, आंबेगाव आणि शिरूरच्या आमदारांकडूनही जनतेची तीच अपेक्षा असल्याचे सांगण्यात येते.