

पुणे: बदलत्या हवामानात आणि हिवाळ्याच्या हंगामात फ्लूचा संसर्ग झपाट्याने वाढतो. त्यामुळे वेळेवर लस घेतल्यास गंभीर आजार आणि गुंतागुंत टाळता येऊ शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. दरवर्षी जागतिक इन्फ्लुएन्झा लसीकरण सप्ताह संपूर्ण देशात साजरा केला जातो. इन्फ्लुएन्झा (फ्लू) आजाराबाबत जनजागृती करणे आणि लसीकरणाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवणे, हा यामागचा उद्देश आहे. स्वाईन फ्लूच्या प्रतिबंधासाठीही इन्फ्लुएन्झा लसीकरणाचा सल्ला दिला जातो.
इन्फ्लुएन्झा हा विषाणूजन्य आजार असून ताप, सर्दी, खोकला, घसा दुखणे, अंगदुखी, अशक्तपणा अशी लक्षणे दिसून येतात. काही वेळा हा आजार सौम्य स्वरूपाचा असला, तरी ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, गर्भवती महिला आणि मधुमेह, हृदयरोग, फुफ्फुसांचे आजार असलेल्या व्यक्तींमध्ये फ्लू गंभीर स्वरूप धारण करू शकतो. या पार्श्वभूमीवर नॅशनल इन्फ्लुएन्झा लसीकरण सप्ताह महत्त्वाचा ठरतो, असे मत जनरल फिजिशियन डॉ. अनिकेत देशपांडे यांनी व्यक्त केले.
डॉक्टरांच्या मते, फ्लूची लस सुरक्षित असून तिचे दुष्परिणाम अत्यंत किरकोळ असतात. लसीकरणामुळे संसर्ग होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होते. आजार झालाच, तर त्याची तीवता कमी राहते. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे, हात वारंवार धुणे, मास्कचा वापर आणि आजारी व्यक्तींपासून अंतर ठेवणे या प्रतिबंधात्मक उपायांसोबत लसीकरण हा फ्लूपासून बचावाचा प्रभावी मार्ग आहे. आरोग्य विभागाने नागरिकांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले आहे.
लस कुठे उपलब्ध ?
इन्फ्लुएन्झा लसीचा नियमित राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात समावेश नाही. त्यामुळे लस घेणे ऐच्छिक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. सर्वसाधारणपणे, ससून रुग्णालयासह औंध जिल्हा रुग्णालय आणि महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये लस उपलब्ध असते. शासकीय रुग्णालयांमध्ये गर्भवतींना दुसर्या तिमाहीमध्ये लस दिली जाते. त्यासाठी त्यांची अनुमती घेतली जाते. महापालिकेतर्फे सार्वजनिक आरोग्य विभागाकडे 3000 लसींची मागणी करण्यात आली आहे. अद्याप लसींचे डोस आले नसल्याने सध्या लस उपलब्ध नाही. खासगी दवाखाने, रुग्णालयांमध्ये लस सहज उपलब्ध होते. लसीची किंमत 1500 ते 2000 रुपयांच्या दरम्यान आहे.
इन्फ्लुएन्झा लस कधी घ्यावी ?
इन्फ्लुएन्झा (फ्लू)ची लस दरवर्षी एकदा घेणे आवश्यक असते. कारण फ्लू व्हायरसचे प्रकार सतत बदलत राहतात.
साधारणपणे ऑक्टोबर ते फेबुवारी हा काळ लस घेण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो.
सहा महिन्यांवरील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, मधुमेह, हृदयरोग, फुफ्फुसाचे आजार, किडनी आजार असलेले रुग्ण, आरोग्य कर्मचारी यांनी आवर्जून लस घ्यावी.
लस घेतल्यानंतर साधारणतः 2 आठवड्यांत रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते.
इन्फ्लुएन्झा हा साधा समजला जाणारा आजार असला तरी काही रुग्णांसाठी तो गंभीर ठरू शकतो. लसीकरण हा फ्लूपासून संरक्षणाचा सर्वात सुरक्षित आणि प्रभावी मार्ग आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, लहान मुले आणि आजाराने ग््रास्त व्यक्तींनी दरवर्षी फ्लूची लस जरूर घ्यावी.
डॉ. निकिता साळुंखे, जनरल फिजिशियन